रात्रीच्या एक्स्पे्रसमधील चोऱ्यांचे सत्र

By Admin | Updated: October 16, 2014 22:53 IST2014-10-16T22:21:55+5:302014-10-16T22:53:25+5:30

रेल्वे पोलिसांकडून उपाययोजना : दिवाळीसाठी पोलीस यंत्रणा सतर्क

Nightmares for thieves in the night sky | रात्रीच्या एक्स्पे्रसमधील चोऱ्यांचे सत्र

रात्रीच्या एक्स्पे्रसमधील चोऱ्यांचे सत्र

मिरज : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रात्रीच्या रेल्वेगाड्यांत प्रवाशांच्या किमती साहित्याच्या चोऱ्या रोखण्यासाठी मिरज रेल्वे पोलीस व रेल्वे सुरक्षा दलाने रात्रीच्या रेल्वेगाड्यांत बंदोबस्त सुरू केला आहे. गतवर्षी दिवाळीदरम्यान चोरट्यांनी प्रवाशांचा लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याने चोऱ्यांचे सत्र रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत.
मिरजेकडे येणाऱ्या जोधपूर-बेंगलोर, अजमेर- बेंगलोर, गांधीधाम-बेंगलोर या लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसमधील प्रवाशांना लुबाडण्याच्या घटना वारंवार घडतात. गतवर्षी दिवाळीपूर्वी चोरट्यांनी रात्रीच्या रेल्वेगाड्यांमध्ये महिनाभर धुमाकूळ घालून झोपेत असलेल्या प्रवाशांची लूटमार केली होती. पाहटेच्यावेळी लोणावळा ते पुणेदरम्यान प्रवासी झोपेत असताना प्रवाशांच्या बॅगा चोरीला जातात. सकाळी पुणे स्थानक सोडल्यानंतर बॅगा चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर मिरज रेल्वे पोलिसांत तक्रारी दाखल होतात. काही प्रवासी बेळगाव रेल्वे पोलिसांत चोरीची फिर्याद देतात. गतवर्षी दिवाळीपूर्वी आठवड्यात अजमेर, जोधपूर गांधीधाम या एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांची रोख रक्कम, दागिने, मोबाईल व किमती वस्तूंच्या चोरीचे अनेक प्रकार घडले होते. कल्याण वसई परिसरातील टोळ्यांनी रात्रीच्या रेल्वेगाड्यांत धुमाकूळ घालून प्रवाशांना व रेल्वेच्या सुरक्षा यंत्रणांना हैराण केले होते. रेल्वेच्या आरक्षित बोगीसह वातानूकूलित व सर्वसाधारण बोगीतही चोऱ्या झाल्याने एक्स्प्रेसमधून रात्रीच्या प्रवासाचा प्रवाशांना चांगलाच फटका बसला होता. लोणावळा ते पुणेदरम्यान रेल्वे प्रवाशांचे साहित्य चोरणाऱ्या टोळ्या सक्रिय असून, रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेऊन काही टोळ्यांना रेल्वे पोलिसांनी जेरबंद केले आहे. (वार्ताहर)

पायबंद घालण्याचा दावा
दिवाळी प्रवासासाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या बॅगा चोरीच्या घटना होऊ नयेत, यासाठी रेल्वे पोलीस व रेल्वे सुरक्षा दलाने उपापयोजना सुरू केल्या आहेत. अजमेर, जोधपूर, गांधीधाम या एक्स्प्रेसमध्ये रेल्वे सुरक्षा दलाने गस्त सुरू केली आहे. रात्रीच्या रेल्वेगाड्यात सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त असल्याने दररोज होणाऱ्या चोऱ्यांना पायबंद घालण्यात आल्याचा रेल्वे पोलिसांचा दावा आहे.

Web Title: Nightmares for thieves in the night sky

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.