सांगली : पुढील वर्षी म्हणजे २०२६ मध्ये गणपती बाप्पा सप्टेंबरच्या मध्यात आपल्या घरी येतील. १४ सप्टेंबरला बाप्पाचे आगमन होईल, तर २५ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी असेल. त्यामुळे यंदाच्या तारखेनुसार मोजल्यास पुढील वर्षी बाप्पाच्या आगमनासाठी भाविकांना १८ दिवस जास्त वाट पाहावी लागणार आहे.यंदा शनिवारी (दि. ६) गणपती बाप्पाला `पुढच्या वर्षी लवकर या`च्या गजरात भाविकांनी साश्रुनयनांनी निरोप दिला. पण बाप्पा पुढच्या वर्षी लवकर येणार नाहीत हे स्पष्ट आहे. तिथी आणि तारखेनुसार यावर्षीपेक्षा पुढच्या वर्षी त्यांचे आगमन १८ दिवस उशिरा होईल. यंदा २७ ऑगस्ट रोजी बाप्पांचे आगमन झाले. घरोघरी ११ दिवसांच्या आराधनेसाठी विराजमान झाले. परंपरेप्रमाणे पाचव्या, सातव्या, नवव्या आणि अकराव्या दिवशी त्यांना निरोप देण्यात आला. दीड दिवसाच्या बाप्पाचेही विसर्जन झाले. आता भक्तांचे डोळे पुढील वर्षाच्या आगमनाकडे आहेत. विशेषत: गणेशोत्सव दणक्यात साजरा करणाऱ्या सार्वजनिक मंडळांना पुढील वर्षाच्या आगमनाची प्रतीक्षा आहे. पण त्यांना पुढील वर्षी दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ वाट पाहावी लागणार आहे. पुढील वर्षी १७ सप्टेंबर रोजी गौरी आवाहन आणि १८ सप्टेंबर रोजी गौरीपूजन आहे. हरितालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी येणार आहे. तसेच, सहाव्या दिवशी गौरी विसर्जन होणार आहे.
पुढच्या वर्षी गणपती बाप्पा लवकर नाही येणार, गणेशभक्तांना १८ दिवस जास्त वाट पाहावी लागणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 17:14 IST