महाराष्ट्रदिनी कुपवाडचे नवीन प्रभाग कार्यालय सुरू होणार
By Admin | Updated: February 6, 2015 00:38 IST2015-02-05T23:56:11+5:302015-02-06T00:38:39+5:30
अजिज कारचे : इमारतीचे बांधकाम त्वरित पूर्ण करण्याची तयारी

महाराष्ट्रदिनी कुपवाडचे नवीन प्रभाग कार्यालय सुरू होणार
कुपवाड : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या धर्तीवर कुपवाड शहरात नव्याने बांधण्यात येणारे प्रभाग समिती क्रमांक तीनच्या कार्यालयाचे बांधकाम कोणत्याही परिस्थितीत एप्रिलअखेर पूर्ण करण्यात येणार आहे. येत्या महाराष्ट्रदिनी हे नवीन प्रभाग कार्यालय सुरू होणार असून, जुन्या कार्यालयाचे सर्व विभाग त्यामध्ये स्थलांतरित होतील, अशी माहिती आयुक्त अजिज कारचे यांनी दिली. महापालिका आयुक्त अजिज कारचे, नूतन उपमहापौर प्रशांत पाटील यांनी नुकतीच नव्याने बांधण्यात येणाऱ्या प्रभाग कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी इमारतीच्या बांधकामाची पाहणी केली. एप्रिलअखेर या कार्यालयाचे बांधकाम पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी ठेकेदाराला दिल्या. त्यासाठी निधीही कमी पडू दिला जाणार नसल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. उपमहापौर प्रशांत पाटील यांनीही अधिकाऱ्यांना या बांधकामावर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या. यावेळी नगरसेवक विष्णू माने, शेडजी मोहिते, नगरअभियंता चंद्रकांत सोनवणे, शाखा अभियंता अशोक कुंभार, सुनील नाईक, एन. डी. दळवी आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
सहायक आयुक्तांची खरडपट्टी
महापालिकेचे आयुक्त कारचे हे नव्याने बांधण्यात येणाऱ्या प्रभाग इमारतीच्या कामावर हजर झाले. परंतु कुपवाडची जबाबदारी असलेले सहायक आयुक्त चंद्रकात चौधरी हे उशिराने हजर झाले. त्यामुळे संतप्त बनलेल्या आयुक्तांनी त्यांची चांगलीच खरडपट्टी केली. कुपवाडच्या कामाबाबत हलगर्जी करू नका, अशा सूचनाही त्यांनी त्यांना दिल्या.