जिल्हा बँकेकडून नव्या योजनांची बरसात
By Admin | Updated: October 20, 2015 23:51 IST2015-10-20T23:17:55+5:302015-10-20T23:51:45+5:30
कर्ज मर्यादेत वाढ : संत्री, मोसंबी, झेंडू, शेवगा उत्पादनालाही मिळणार कर्ज

जिल्हा बँकेकडून नव्या योजनांची बरसात
सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक योजनांची बरसात आगामी वर्षासाठी करण्यात आली. तांत्रिक समितीच्या बैठकीत पीक कर्जाच्या मर्यादेत मोठ्या प्रमाणावर वाढ करणे, नव्या पिकांचा कर्जपुरवठ्यात समावेश करणे, कर्जदार शेतकऱ्यांचा विमा उतरविणे, वाहन कर्जाची मर्यादा वाढविणे अशा अनेक योजनांची सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली. पाटील म्हणाले की, संपर्क अभियानात सभासद शेतकऱ्यांनी पीक कर्जवाटपाबाबत अनेक अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. त्यांच्या अपेक्षांची पूर्तता करतानाच त्यांच्यासाठी नव्या योजना अंमलात आणण्याचा निर्णय तांत्रिक समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यामध्ये चालू वर्षाच्या तुलनेत २0१६-१७ साठीच्या कर्जमर्यादेत मोठी वाढ केली आहे. अनेक पिकांच्या कर्जमर्यादेत दुप्पट, दीडपट वाढ झाली आहे. ज्या पिकांचा समावेश कर्जवाटप धोरणात नव्हता, त्या पिकांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे शेतीला प्रोत्साहन व बळ देण्याचा प्रयत्न या योजनांच्या माध्यमातून होणार आहे.
पिकांच्या यादीत वाढ झाली असून पुढील आर्थिक वर्षापासून झेंडू, शेवगा, संत्री, मोसंबी या पिकांनाही बँक कर्जपुरवठा करणार आहे. वाहन कर्जाच्या मर्यादेतही मोठी वाढ केली आहे. वाहनाच्या मूळ किमतीवर ७५ टक्के कर्जपुरवठा यापूर्वी केला जात होता. आता दुचाकी, चारचाकी वाहनांसाठी ९0 टक्के कर्जपुरवठा केला जाणार आहे.
या बैठकीस जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर, नाबार्डचे अधिकारी एन. शिवकुमार, कोल्हापूर कृषी महाविद्यालयाचे आर. आर. सूर्यवंशी, तज्ज्ञ शेतकरी प्रशांत पाटील, ईश्वर पवार, शंकर पाटील, रवी पाटील, संभाजी बोराडे, राज्य सहकारी बँकेचे तपासणीस एस. के. पाटील, कृषी अधिकारी आर. जे. भोसले, वसंतदादा व राजारामबापू साखर कारखान्याचे शेती अधिकारी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पदांचा नवा आराखडा
जिल्हा मध्यवर्ती बॅँकेतील नोकरभरतीचा मार्ग लवकरच मोकळा होणार आहे. नाबार्डच्या सूचनेप्रमाणे पदांचा नवा आराखडा तयार करण्यात आला आहे. खेळते भांडवल, शाखानिहाय उलाढाल आदी निकषांवर आधारित आराखड्याअंतर्गत एकूण १ हजार ५३० कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. सध्या बॅँकेत १ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. आराखडा मंजूर झाल्यानंतर भरतीचा मार्ग मोकळा होणार आहे.
शेतकऱ्यांसाठी विमा
सोसायटी सभासद असलेल्या कर्जदार शेतकऱ्यांचा पंतप्रधान सुरक्षा विमा योजना उतरविण्याचा निर्णय तांत्रिक समितीच्या बैठकीत घेण्यात आला. सध्या बँकेचे एकूण १ लाख ६१ हजार ५४९ सभासद शेतकरी आहेत. या सर्वांना याचा लाभ मिळणार आहे. विम्यापोटी भरावी लागणारी रक्कम बँक भरणार आहे.
नव्या पिकांना कर्ज
संत्री व मोसंबीसाठी हेक्टरी ७0 हजार, झेंडूसाठी हेक्टरी ३४ हजार, तर शेवग्यासाठी १ लाखापर्यंत कर्जपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.
कर्मचाऱ्यांना ८.३३ टक्के बोनस
जिल्हा बॅँकेच्या कर्मचाऱ्यांच्या दिवाळीचा गोडवा वाढविताना बॅँकेने यंदा ८.३३ टक्के बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या कर्मचाऱ्यांमधून या निर्णयाबद्दल स्वागत होत आहे.