विट्यात 'मॉडर्न’मध्ये नवे लसीकरण केंद्र सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:26 IST2021-05-14T04:26:11+5:302021-05-14T04:26:11+5:30
फोटो :- विटा येथील मॉडर्न शैक्षणिक संकुलात नव्या कोविड लसीकरण केंद्राला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर, संस्थेचे अध्यक्ष ...

विट्यात 'मॉडर्न’मध्ये नवे लसीकरण केंद्र सुरू
फोटो :- विटा येथील मॉडर्न शैक्षणिक संकुलात नव्या कोविड लसीकरण केंद्राला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर, संस्थेचे अध्यक्ष विनोदराव गुळवणी, डॉ. अविनाश लोखंडे आदींनी भेट देऊन पाहणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : विटा शहरातील ग्रामीण रुग्णालयात कोविड सेंटर, कोरोना संशयित रुग्णांची तपासणी व लसीकरण हे सगळं एकाच ठिकाणी असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. त्यामुळे आ. अनिल बाबर यांच्या सूचनेनुसार प्रशासनाने ग्रामीण रुग्णालयातील लसीकरण केंद्र बंद करून शहरातील मॉडर्न शैक्षणिक संकुलात नवे केंद्र सुरू केले आहे.
या नव्या केंद्राचा शुभारंभ गुरुवारी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर व मॉडर्नचे अध्यक्ष विनोदराव गुळवणी यांच्याहस्ते झाला. या नव्या केंद्रात लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली.
विटा शहरात लोकांना कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी शहरापासून दोन कि मी अंतरावर असलेल्या ग्रामीण रुग्णालयात जावे लागत होते. यामुळे लसीकरण केंद्र शहरात सुरू होणे अपेक्षित होते. आमदार अनिल बाबर यासाठी प्रांताधिकारी संतोष भोर यांना सूचना केली होती. त्यानंतर प्रांताधिकारी भोर, तहसीलदार ऋषिकेत शेळके आणि ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश लोखंडे यांची चर्चा होऊन मॉडर्न शाळा हे ठिकाण लसीकरणाच्या दृष्टीने योग्य असल्याचे सांगितले.
उद्घाटन कार्यक्रमास विटा ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश लोखंडे, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष हेमंत बाबर, पंचायत समितीचे सुनील देशपांडे, श्री. वाझे यांनी पाहणी केली.
कोट
विटा शहरांतील मॉडर्न शैक्षणिक संकुलात आज नवे लसीकरण केंद्र सुरू झाले आहे. त्यामुळे आता लोकांना ग्रामीण रुग्णालयात जाण्याची गरज नाही. विटा शहरात अजून दोन ठिकाणी लसीकरण केंद्र चालू करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
- आ. अनिल बाबर