गुन्हेगारीतील नवे चेहऱ्यांमुळे पाेलिसांची वाढली डोकेदुखी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:19 IST2021-06-20T04:19:21+5:302021-06-20T04:19:21+5:30
सांगली : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अगोदरच गेल्या दीड वर्षापासून पोलिसांचे काम वाढले असताना, गुन्हेगारीत आलेल्या नवीन चेहऱ्यांमुळे डोकेदुखी वाढली ...

गुन्हेगारीतील नवे चेहऱ्यांमुळे पाेलिसांची वाढली डोकेदुखी!
सांगली : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अगोदरच गेल्या दीड वर्षापासून पोलिसांचे काम वाढले असताना, गुन्हेगारीत आलेल्या नवीन चेहऱ्यांमुळे डोकेदुखी वाढली आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून गुन्हे करण्यासाठी नवीन तरुणांना वापरण्यात येत असून, त्यातही अल्पवयीनांचा वापर करून गुन्हे होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पोलिसांना रेकॉर्डवरील गुन्हेगारांबरोबरच या नव्या संशयितांवर नजर ठेवावी लागत आहे.
जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यात पोलिसांना यश आले आहे. वर्चस्ववाद आणि टोळ्यांवर बडगा उगारल्याने जिल्ह्यात असे प्रकार कमी झाले आहेत. मोक्कासारख्या कारवाईमुळेही गुन्हेगारीचे, पोलिसांना आव्हान देऊन कारनामे करणारे थंड झाले आहेत. मात्र, चाेरीसारख्या घटनांमध्ये नव्या गुन्हेगारांची एन्ट्री होत आहे. सध्या वाढत असलेल्या दुचाकी व मोबाइल चोरीच्या घटनांमध्ये ताब्यात घेतलेले अनेक तरुण हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार नाहीत. याशिवाय जिल्ह्याबाहेरीलही अनेक जण गुन्हेगारीत सक्रिय होताना दिसून येत आहेत. त्यातही अल्पवयीन तरुणांचा वापर करून त्यांच्याव्दारे गुन्हे करून घेणाऱ्यांवरही आता पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. तरीही नव्याने तरुण गुन्हेगारी क्षेत्रात येऊ नयेत यासाठी पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली समुपदेशनाचेही कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत.
चौकट
गुन्हेगारीत नवे चेहरे का आले?
* कमी वयात शाळा सोडल्याने लागलेल्या वाईट सवयी व नको त्या मित्रांच्या संगतीमुळे अनेक जण पोलिसांच्या रेकॉर्डवर येतात.
* कमी श्रमात पैसा मिळविण्याची हौसही अनेकांना यात ओढून आणते आणि त्यांच्या आयुष्याची राखरांगोळी होते.
* नवीन तरुणांना हाताशी धरून चोरी, दरोडा यासारखे गुन्हे करणारे असल्यानेही नवीन मुले यात ओढली जात आहेत.
चौकट
खबऱ्यांची भूमिका महत्त्वाची
* कोणताही गुन्हा घडला की संशयितांपर्यंत पोहोचण्यासाठी खबऱ्यांची मोठी मदत होते. पोलिसांचे असे एक ‘अंडर ग्राउंड’ नेटवर्क तयार असते.
* ज्या भागात गुन्हा घडला त्या भागातील इत्थंभूत माहितीसाठी खबऱ्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
चौकट
जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आलेख असा
चोऱ्या
२०१९ १४६२
२०२० १०९६
२०२१ मेपर्यंत ६५३
दरोडा
२०१९ १८
२०२० १२
२०२१ मेपर्यंत ५
खून
२०१९ ५९
२०२० ५५
२०२१ मेपर्यंत २७
खुनाचा प्रयत्न
२०१९ १३७
२०२० १४५
२०२१ मेपर्यंत ५२
कोट
जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाले असलेतरी नवीन तरुण त्यात अडकू नयेत यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्यांना गुन्हेगारीपासून परावृत्त करून व्यवसायाच्या संधीचे प्रशिक्षण, समुपदेशन दिले जात आहे.
दीक्षित गेडाम, पोलीस अधीक्षक
कोट
कमी वयात नको त्या लागलेल्या सवयी व झटपट पैसे मिळविण्यासाठी अनेक तरुण यात अडकतात. या मुलांचे योग्य समुपदेशन झाल्यास त्यांना गुन्हेगारीपासून परावृत्त करता येते. यासाठी त्यांची मानसिकता ओळखून त्यांना योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असते.
पवन गायकवाड, मानसोपचारतज्ज्ञ