नेट बॅँकिं ग फसवणुकीतील सात लाख रुपये वाचले
By Admin | Updated: September 18, 2014 23:29 IST2014-09-18T22:59:42+5:302014-09-18T23:29:05+5:30
पोलिसांची दक्षता : पथक मुंबईला रवाना

नेट बॅँकिं ग फसवणुकीतील सात लाख रुपये वाचले
सांगली : नेट बँकिंगद्वारे पासवर्ड मिळवून व मोबाईल हॅँग करून माधवनगर (ता. मिरज) येथील शुक्रवार पेठेतील महिला व्यापारी सुश्मिता खाटक यांच्या बँक खात्यातून ११ लाख १५ हजारांची रोकड चोरट्यांनी लंपास केल्याचे उघडकीस आल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने गतीने तपास राबविल्याने चोरट्यांच्या ताब्यात गेलेली सहा लाख ७३ हजारांची रक्कम वाचविण्यात यश आले आहे. चोरट्यांनी केवळ चार लाख रुपये काढले आहेत. उर्वरित रक्कम ते काढण्यापूर्वीच पोलिसांनी बँकेस पत्र देऊन ही रक्कम काढून देऊ नये, अशी सूचना केली.
सुश्मिता खाटक यांचे युनियन बँकेच्या माधवनगर शाखेत खाते आहे. त्यांच्या खात्यावरून ११ लाख १५ हजारांची रोकड चोरट्यांनी परस्पर काढली होती; मात्र त्यांचा मोबाईल हँग करण्यात आल्याने त्यांना रक्कम काढल्याचा बँकेतून मोबाईलवर मेसेज आला नाही. यामुळे त्यांनाही हा प्रकार समजला नाही.
मोबाईल सुरू झाल्यानंतर बँकेतून रक्कम काढल्याचा मेसेज आल्यानंतर त्यांना हा प्रकार समजला होता. त्यानंतर त्यांनी जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांच्याकडे धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला. सावंत यांच्या आदेशावरून विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मात्र हा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र डोंगरे यांच्याकडे सोपविला होता.
डोंगरे यांनी खाटक यांच्या बँक खात्यावरून रक्कम कोणाच्या नावावर व कोणत्या बँकेत हस्तांतर झाली? याचा शोध घेतला. त्यावेळी ही रक्कम आयसीआयसीआय बँकेत रवी नारायण या संशयिताच्या नावावर हस्तांतर झाल्याचे निष्पन्न झाले. संशयिताने मुंबईतील खारघर येथील एका एटीएममधून चार लाख रुपये काढले होते. उर्वरित रक्कम तो काढण्यापूर्वीच डोंगरे यांनी आयसीआयसीआय बँकेस पत्र देऊन ही रक्कम आता काढू देऊ नये, असे पत्र दिले आहे. (प्रतिनिधी)
संशयिताचा शोध
रवी नारायणसह अन्य दोघांची नावे निष्पन्न झाली आहेत. त्यांना ताब्यात घेण्यासाठी डोंगरे यांचे पथक गुरुवारी सायंकाळी मुंबईला रवाना झाले आहे. त्यांनी रोकड स्वत:च्या नावावर कशी हस्तांतर केली, हे अद्याप निष्पन्न झाले नाही. संशयित सापडल्यानंतरच याचा उलगडा होईल, असे डोंगरे यांनी सांगितले.