नेर्ले रात्रीत फिरले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:34 IST2021-06-09T04:34:45+5:302021-06-09T04:34:45+5:30

यशवंतराव मोहिते यांनी सुरुवातीला बंधू जयवंतराव भोसले यांच्या हाती कारखान्याची सत्ता दिली. १९६० मध्ये मोहिते-भोसले यांच्या नातेसंबंधातून नेर्ले गावात ...

Nerley wandered in the night! | नेर्ले रात्रीत फिरले!

नेर्ले रात्रीत फिरले!

यशवंतराव मोहिते यांनी सुरुवातीला बंधू जयवंतराव भोसले यांच्या हाती कारखान्याची सत्ता दिली. १९६० मध्ये मोहिते-भोसले यांच्या नातेसंबंधातून नेर्ले गावात भाऊसाहेब पाटील एकमेव पहिले संचालक झाले. यावेळी या परिसरात ४०० सभासद होते. १९६५ च्या दरम्यान येवलेवाडीत जलसिंचन योजना कार्यरत झाली. योजनेमुळे नेर्ल्याचा पूर्व भाग ओलिताखाली आला. त्यानंतर केदारनाथ सोसायटीच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्गापलीकडील सर्व शेती ओलिताखाली आली आणि हा परिसर उसाच्या पिकाखाली आला. शेतकरी सधन झाला. त्यानंतर ‘कृष्णे’वर भाऊसाहेब पाटील यांचे पुत्र रवींद्र पाटील यांना स्वीकृत संचालकपद देण्यात आले.

यावेळी कारखान्यात राजकीय संघर्ष नव्हता. १९८९ च्या दरम्यान ज्या पाणीपुरवठा संस्था होत्या, त्यांचे पाणी पाझरून परिसरातील विहिरींना जात होते. ‘कृष्णे’ने त्याचा पाझर कर शेतकऱ्यांवर लावला. शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी या धोरणाविरोधात आंदोलन उभे केले, तेही नर्ले येथूनच. या आंदोलनाला यशवंतराव मोहिते यांनी साथ देऊन स्वत:च्या भावाची सत्ता उलथवून टाकली. तेव्हापासूनच मोहिते-भोसले वादाचा नारळ नेर्लेतच फुटला. रयत पॅनलचे मदन मोहिते सलग दहा वर्षे अध्यक्ष होते. या कालावधीतच खुले सभासदत्व करण्याचा निर्णय झाला. त्यामुळे नेर्लेतील सभासदांची संख्या १४०० च्या घरात गेली. तेव्हापासूनच नेर्लेची भूमिका सत्तांतर करण्यात निर्णायक ठरू लागली.

मदनराव मोहिते यांच्या कारकीर्दीत नेर्लेतील सर्जेराव जनार्दन पाटील संचालक होते. त्यानंतर सहकार पॅनलने सुरेश भोसले यांचे नेतृत्व पुढे आणण्यासाठी नेर्लेची भूमिका महत्त्वाची ठरली आणि भोसले गटाकडून येथून सर्जेराव गुंडा पाटील, पतंगराव पाटील संचालक झाले. एका संचालकाचे निधन झाल्याने महाराष्ट्र केसरी आप्पासाहेब कदम यांना संधी दिली गेली. त्यानंतर इंद्रजित मोहिते यांची सत्ता आल्यानंतर या गावात दोघांऐवजी एकालाच म्हणजे चंद्रशेखर पाटील यांना संधी देण्यात आली.

भोसले-मोहिते यांचे मनोमिलन नेर्लेकरांना रुचले नाही. त्यांनी अविनाश मोहिते यांच्या रूपाने संस्थापक पॅनलला कौल दिला. गेल्या निवडणुकीत पुुन्हा ‘सहकार’ला संधी देऊन नेर्लेने ताकद दाखविली. आता सहकार पॅनलने जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे नातेवाईक संभाजी पाटील यांना, तर महाडिक गटाचे इंदुमती जाखले यांना उमेदवारी दिली आहे. इंद्रजित मोहिते यांनी प्रशांत पाटील हा एकमेव उमेदवार दिला आहे. अविनाश मोहिते यांनी वसंतराव पाटील आणि सुभाष पाटील यांच्यापैकी एकाला उमेदवारी देण्याचा डाव आखला आहे. यावेळीही नेर्ले कोणाकडे झुकेल, याचा अंदाज तिन्ही नेत्यांच्या प्रमुखांना येत नसल्याने हे नेते रात्रीच्या गाठीभेटीवर भर देत आहेत.

-अशोक पाटील, इस्लामपूर

Web Title: Nerley wandered in the night!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.