खोकीधारकांच्या सर्व्हेची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2015 00:30 IST2015-07-29T23:31:54+5:302015-07-30T00:30:03+5:30
खोकीधारकांच्या सर्व्हेची गरज

खोकीधारकांच्या सर्व्हेची गरज
अशोक पाटील- इस्लामपूर शहरातील खोकीधारकांसाठी पालिकेने ठराविक आकाराची खोकी तयार करुन बसविण्याची योजना अंमलात आणली आहे. याचे व्यावसायिक व सर्वसामान्यांकडून स्वागत होत आहे. परंतु गरजू व गरीब व्यावसायिकांना काहींनी आपली खोकी भाड्याने दिली आहेत. त्यामुळे अशा खोक्यांचा पालिकेने सर्व्हे करुन, जो तेथे स्वत: व्यवसाय करेल, त्यालाच पालिकेचे खोके द्यावे. तसेच खोक्याचे भाडे घेणाऱ्या मालकांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.
इस्लामपूर शहराची वाढती लोकसंख्या आणि शहरातील रस्त्यांचा प्रश्न बिकट होत चालला आहे. शहरातील विविध रस्त्यांवर बेकायदेशीर खोक्यांचे साम्राज्य असल्याने वाहतुकीचीही मोठी कोंडी होत आहे. यावर पालिकेने चांगला पर्याय शोधून काढला आहे. ज्या ज्या ठिकाणी खोक्यामध्ये व्यवसाय सुरु आहे, त्याठिकाणी एका ठराविका आकाराची पत्र्याची खोकी पालिकेने देण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. ही खोकी रस्त्याच्या एका बाजूने एका आकारात बसविण्यात येत असल्याने, शहराच्या सौंदर्यातही भर पडत आहे. तसेच पालिकेच्या उत्पन्नातही यामुळे वाढ झाली आहे.
सध्या व्यावसायिकांकडून एका खोक्यासाठी २२ हजार रुपये डिपॉझीट घेतले जात आहे. तसेच दररोज नाममात्र भाडे घेतले जाणार आहे. त्यामुळे या खोक्यांमध्ये व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. परंतु बहुतांशी खोकी मालक वेगळे आणि त्यामध्ये व्यवसाय करणारे वेगळे आहेत. पालिकेने दिलेले खोके खोकी मालक भाड्याने व्यवसाय करणाऱ्यांना देत आहेत. यामध्ये सर्वसामान्य व्यावसायिकाला तोटा सहन करावा लागत आहे. अशा खोकी मालकांचा पालिकेने सर्व्हे करुन, ‘एक तर स्वत: व्यवसाय करा, अन्यथा खोके सोडा’, असा निर्णय घेण्याचा पवित्रा घ्यावा, अशीही मागणी होत आहे.
शहरातील अनेक ठिकाणी पूर्वीपासून व्यवसाय करणाऱ्या खोकी मालकांची खोकी आहेत. यातील काहींनी व्यवसाय बंद केला असला तरी, खोकी काढलेली नाहीत. जी खोकी बंद अवस्थेत त्या मालकांकडे आहेत, ती इतर व्यावसायिक भाड्याने मागतात. परंतु असे खोकी मालक खोक्याची जागा स्वत:च्याच मालकीची असल्याचा आव आणत लाखो रुपयांना खोके विकतात. अशा बऱ्याच घटना घडत आहेत. याचीही दखल पालिकेने घेणे गरजेचे आहे.
शहरातील सर्वसामान्य व्यावसायिकांना पालिकेने दिलेल्या खोक्यांमध्ये गोलमाल झाला आहे. या खोक्यांना वापरलेला पत्रा हलक्या दर्जाचा आहे. दरम्यान, कोणताही ठराव न करता सत्ताधाऱ्यांनी ही खोकी बसविण्याचा घाट घातला आहे. पूर्वीच्या जागेवर असलेल्या खोकी मालकांना नवीन खोकी न देता, तोडपाणी करणाऱ्याला जागा व खोके उपलब्ध करुन दिले जात आहे.
- विजय कुंभार, विरोधी पक्षनेते.
कागलच्या ठेकेदाराला काम देण्याचा उद्देश काय?
पालिकेने शहरातील खोकी बनविण्याचा निर्णय घेतला, तेव्हा याचे काम स्थानिक व्यावसायिकांना मिळावे, अशी मागणी केली होती. परंतु पालिकेने याचा अलिखित ठेका कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील व्यापाऱ्यांना दिला आहे. इस्लामपूर शहरात अशी खोकी तयार करुन देणाऱ्या फॅब्रिकेटर्स व्यावसायिकांची संख्या मोठी आहे. हे काम आम्हाला मिळाले असते, तर शहरातील कारागीरांच्या हाताला काम मिळाले असते, असे वाळवा तालुका फॅब्रिकेशन असोसिएशनचे अध्यक्ष मीनाज दिवाण म्हणाले.