साहित्यिकांची कंपूशाही मोडीत काढण्याची गरज

By Admin | Updated: March 30, 2015 00:17 IST2015-03-29T23:38:16+5:302015-03-30T00:17:23+5:30

अरूण गोडबोले : सांगलीत ‘वसंतायन’चे प्रकाशन

The need to remove literary compunction | साहित्यिकांची कंपूशाही मोडीत काढण्याची गरज

साहित्यिकांची कंपूशाही मोडीत काढण्याची गरज

सांगली : मराठी साहित्य विश्वातील साहित्य परिषद आणि मंडळे ही केवळ प्रसिध्दीच्या मागे लागल्याचे चित्र असून, भविष्यकाळात साहित्यिकांची कंपूशाही मोडीत काढणे गरजेचे असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक अरुण गोडबोले यांनी आज रविवारी व्यक्त केले.
ज्येष्ठ साहित्यिक प्रा. वसंत केशव पाटील यांच्या पन्नास वर्षीय वाड्:मयीन सेवेचा मागोवा घेणाऱ्या ‘वसंतायन’ या सन्मानग्रंथाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. राजमती भवन येथे झालेल्या कार्यक्रमात माजी आमदार शरद पाटील आणि साहित्यिक तारा भवाळकर यांच्याहस्ते प्रा. पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
अरुण गोडबोले म्हणाले, अनेक चांगली पुस्तके निर्माण होत असली तरी दुर्देवाने कित्येकांची वितरण व्यवस्था सक्षम नसते. परिणामी पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचत नाहीत. परिणामी याचा फटका संबंधित पुस्तकांना बसतो. साहित्य परिषद आणि मंडळे यांना जे अनुदान मिळते त्याचाही विचार शासनाकडून होणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर प्रा. वसंत केशव पाटील यांनी ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतली आहे. वाचकांनीही लेखकांना प्रोत्साहन मिळण्यासाठी आणि
सकस साहित्याचा आस्वाद घेण्यासाठी विकत घेऊन पुस्तके वाचनाची सवय लावावी, असे आवाहनही त्यांनी केले.
प्रा. वसंत केशव पाटील यांनी, जीवनाच्या प्रवासात अनेक बरे - वाईट अनुभव आल्यानेच मला खूप काही शिकता आले. महत्त्वाचे म्हणजे शब्दांनी मला लेखनाचे बळ दिले असल्याचे सांगितले. याप्रसंगी प्रा. पाटील यांनी त्यांना आलेल्या विविध अनुभवांचा मागोवा घेतला. प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी, समोरच्या व्यक्तीची पर्वा न करता निर्भिडपणे मत व्यक्त करणारा साहित्यिक म्हणून प्रा. वसंत केशव पाटील यांची साहित्य क्षेत्रात ओळख असल्याचे
सांगितले.
याप्रसंगी महावीर जोंधळे, सुनीता पवार, प्रा. जी. के. ऐनापुरे, प्राचार्य डॉ. अशोक बाबर यांनीही त्यांचे विचार व्यक्त केले. कार्यक्रमास प्रा. वैजनाथ महाजन, प्रा. अविनाश सप्रे, महेश कराडकर, डॉ. अनिल मडके आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

परभाषेत अनुवाद हवा
अरूण गोडबोले म्हणाले की, दर्जेदार मराठी साहित्य निर्माण होत असून, त्याचा इतर परभाषेत अनुवाद होण्यासाठी शासनाने प्रयत्नशील राहण्याची गरज आहे. यामुळे मराठी साहित्याच्या कक्षा रुंदावतील.

Web Title: The need to remove literary compunction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.