हिंदुत्ववाद्यांविरुद्ध आक्रमक होण्याची गरज
By Admin | Updated: September 8, 2015 23:15 IST2015-09-08T23:15:34+5:302015-09-08T23:15:34+5:30
विश्वास सायनाकर : कलबुर्गी यांना सांगलीत आदरांजली

हिंदुत्ववाद्यांविरुद्ध आक्रमक होण्याची गरज
सांगली : हिंदुत्ववाद्यांच्या भ्याड हल्ल्याने विचार नक्कीच संपणार नाहीत. पण, रोज एकाचा बळी घालविणेही पुरोगामी चळवळीला परवडणारे नसल्यामुळे, आपणही आक्रमक होऊन अभ्यासपूर्ण खरा इतिहास जनतेसमोर मांडण्याची गरज आहे. यासाठी मशिदी, बस्ती, मंदिरांमध्ये जाऊन पुरोगामी कार्यकर्त्यांनी प्रबोधन करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य विश्वास सायनाकर यांनी केले. सर्व पुरोगामी संघटनांना एकत्रित करून युवा पिढीमध्ये जागृती करून सरकारला धारेवर धरण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.सर्व पुरोगामी चळवळीतील संघटनांच्यावतीने सांगलीतील कामगार भवनमध्ये ‘पुरोगामी विचारवंताचे मारेकरी व त्यांना संरक्षण देणारे कोण’ या विषयावर परिसंवाद झाला. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉ. एम. एम. कलबुर्गी यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून विश्वास सायनाकर बोलत होते. ते म्हणाले की, कर्मकांड, देवपूजा संपली पाहिजे, म्हणून कलबुर्गी लढले. अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे नरेंद्र दाभोलकर, ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांनीही बहुजन समाजामध्ये अंधश्रध्देविरोधात जनजागृती केली. या जनजागृतीमुळे धर्मांध हिंदुत्ववाद्यांचे व्यवसाय अडचणीत आले, म्हणूनच हिंदुत्ववाद्यांकडून या तिन्ही विचारवंतांना धमक्या येत होत्या. त्यामुळेच हा विचारच संपविण्याच्यादृष्टीने या थोरांचे खून केले का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबद्दल सरकारकडे तक्रारी करूनही खुनी सापडत नाहीत. केंद्र आणि राज्य शासनाच्या भूमिकेबद्दलही सर्वांच्या मनामध्ये शंका निर्माण झाली आहे. आपण रडत न बसता हिंदुत्ववाद्यांच्या विरोधातील भूमिका पुराव्यांसह आक्रमकपणे मांडली पाहिजे.
प्रा. डॉ. बाबूराव गुरव म्हणाले की, जुन्या काळामध्ये संत तुकाराम महाराज, त्यानंतर महात्मा फुले यांच्यावरही हल्ले झाले होते. तीच प्रवृत्ती सध्याही हल्ले करून विचारच संपविण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु, त्यांनी असे केल्याने विचार संपणार नाही. त्यांच्यामध्ये हिंमत असेल तर त्यांनी जाहीर व्यासपीठावर यावे, असेही मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी प्रा. शेखर तंबाखे म्हणाले, कलबुर्गी यांनी लिंगायत समाजामध्ये धर्माबद्दल जागृती करण्याचे काम केले. कॉ. धनाजी गुरव म्हणाले की, कलबुर्गी यांनी विचार आणि व्यवहारात कधीही बदल केला नाही. ब्राह्मणवादी प्रवृत्तीकडून पुरोगामी चळवळी संपविण्याचा प्रयत्न आहे. या प्रवृत्तीविरोधात संघटित लढा देण्याची गरज आहे. डॉ. प्रदीप पाटील, अॅड. अजित सूर्यवंशी, प्रा. मोहन साबळे, डॉ. आर. के. श्रावस्ती यांनी, ब्राह्मणी प्रवृत्तीविरोधात लढण्यासाठी बहुजन समाजामध्ये अंधश्रध्दा व धर्माविषयी जनजागृती करण्यासाठी ठोस नियोजन करण्याची गरज आहे, असे मत व्यक्त केले. यावेळी अॅड. के. डी. शिंदे, विद्या स्वामी, अॅड. अमित शिंदे, शीतल साठे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
वाट चुकलेल्यांनाही जाग्यावर आणण्याची गरज...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, खासदार रामदास आठवले, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर हे बहुजन समाजातील आणि आपल्या विचाराचे नेते आहेत. परंतु, या नेत्यांना ब्राह्मणवाद्यांनी त्यांच्या फायद्यासाठी त्यांच्याकडे खेचले आहे. या वाट चुकलेल्या नेत्यांच्या जिवावर त्यांचे सरकार आले आहे. जातीयवादी सरकार पुन्हा सत्तेवर येऊ नये, यासाठी बहुजन समाजातील वाट चुकलेल्या शेट्टी, आठवले आणि जानकर यांच्याशी चर्चा करून, त्यांना आपल्याकडे आणण्याची गरज आहे, असे मत सायनाकर, कॉ. धनाजी गुरव यांनी व्यक्त केले.