नीटचे परीक्षा केंद्र सांगलीला होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:26 IST2021-04-18T04:26:27+5:302021-04-18T04:26:27+5:30
सांगली : नीट (राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा)चे केंद्र सांगलीमध्ये सुरू करण्याबाबत ॲड. अमित शिंदे व शिष्टमंडळाने शनिवारी खासदार ...

नीटचे परीक्षा केंद्र सांगलीला होणार
सांगली : नीट (राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा)चे केंद्र सांगलीमध्ये सुरू करण्याबाबत ॲड. अमित शिंदे व शिष्टमंडळाने शनिवारी खासदार संजयकाका पाटील यांची भेट घेतली. खासदारांनी तात्काळ केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांना संपर्क केला असता, त्यांनी सांगलीमध्ये केंद्र सुरू करण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. जिल्ह्यातील दहा हजारांहून अधिक मुलांना यामुळे दिलासा मिळणार आहे.
ॲड. अमित शिंदे, डॉ. विशाल मगदूम व शिष्टमंडळाने शनिवारी खासदारांना भेटून नीट परीक्षेचे केंद्र सांगलीत होण्याची आवश्यकता स्पष्ट केली. एनटीएच्यावतीने देशामध्ये नीटच्या परीक्षा घेतल्या जातात. सांगली जिल्ह्यामध्ये ८ अभियांत्रिकी, ३ वैद्यकीय, २ बीडीएस, ३ बीएएमएस, ३ बीएचएमएस तसेच फार्मसी, आर्किटेक्चर महाविद्यालये आहेत. अनेक महत्त्वाच्या परीक्षा सांगली जिल्ह्यामध्ये घेतल्या जातात. जिल्हात १४८ महाविद्यालये असून, सांगली जिल्ह्यामधून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थांना कोल्हापूर जिल्हामध्ये परीक्षेस जावे लागते. कोरोनामुळे मागीलवर्षी अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा देताना अडचणी आल्या होत्या.
यावर्षी जिल्ह्यातून दहा हजारपेक्षा जास्त विद्यार्थी या परीक्षेस बसतील, असा अंदाज आहे. तसेच सांगली शेजारील कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा विचार केल्यास जवळपास वीस हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांसाठी सांगली हे केंद्र सोयीचे ठरणार आहे.
खासदार पाटील यांनी या प्रश्नाबाबत केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांच्याबरोबर फोनवरून चर्चा केली. त्यावेळेस केंद्रीय मंत्र्यांनी कोविडच्या पार्श्वभूमीवर नीटचे परीक्षा केंद्र सांगलीत करण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला व खासदारांना त्याबाबत ई-मेल पाठवण्याची विनंती केली. पाटील यांनी केंद्रीय मंत्री तसेच एनटीएच्या संचालकांना ई-मेल केला. खासदार पाटील यांच्या प्रयत्नाने नीटचे परीक्षा केंद्र सांगलीमध्ये होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे.
यावेळी अभिजित पाटील, महालिंग हेगडे, जयंत जाधव, ॲड. अरुणा शिंदे, अमित पंडित, डॉ. कल्याणी जगदाळे-बावचकर, प्रा. योगेश पाटील, संभाजी पोळ, किरण एरंडोले, प्रा. रोहित कुंभारकर उपस्थित होते.