जतजवळ सराफास मारहाण करून लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:29 IST2021-02-05T07:29:24+5:302021-02-05T07:29:24+5:30
जत : सनमडी (ता. जत) येथील सराफाची दुचाकी अडवून लोखंडी गज व काठीने मारहाण करून त्याच्याजवळील रोख ५० हजार ...

जतजवळ सराफास मारहाण करून लुटले
जत : सनमडी (ता. जत) येथील सराफाची दुचाकी अडवून लोखंडी गज व काठीने मारहाण करून त्याच्याजवळील रोख ५० हजार रुपये व २० ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या असा दीड लाखांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला. सिद्धू महादेव सलगर (वय ३०) असे सराफाचे नाव असून, राम पवार व इतर दोन चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना बुधवारी दुपारी जतपासून एक किलोमीटरवरील आबासो पार्क येथे घडली.
या प्रकरणी सिद्धू सलगर यांनी गुरुवारी सायंकाळी जत पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. सलगर दुचाकीवरून (क्रमांक एमएच १० : १४२४) सनमडीकडून जतला येत होते. त्यांची दुचाकी आबासोा पार्कजवळ आल्यानंतर राम पवार व इतर अज्ञात दोघांनी अडवली. त्यांना लोखंडी गज व काठीने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. ते आरडाओरडा करत असताना त्यांच्या खिशातील रोख ५० हजार रुपये व हातातील दहा ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या हिसकावून घेण्यात आल्या. त्यानंतर अज्ञातांनी पोबारा केला. घटना घडल्यानंतर सलगर यांनी प्राथमिक उपचार करून घेऊन गुरुवारी सायंकाळी उशिरा जत पोलिसांत फिर्याद दाखल केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके करत आहेत.