चित्रदुर्गजवळ पावणेपाच कोटींचे सव्वानऊ किलो सोने हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:21 IST2021-05-29T04:21:18+5:302021-05-29T04:21:18+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कर्नाटकात चित्रदुर्ग शहराजवळ महसूल गुप्तचर संचालनालयाने सोने तस्करीत वडगाव (ता. तासगाव) व कवलापूर (ता. ...

Near Chitradurga, 59 kg of gold worth Rs | चित्रदुर्गजवळ पावणेपाच कोटींचे सव्वानऊ किलो सोने हस्तगत

चित्रदुर्गजवळ पावणेपाच कोटींचे सव्वानऊ किलो सोने हस्तगत

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : कर्नाटकात चित्रदुर्ग शहराजवळ महसूल गुप्तचर संचालनालयाने सोने तस्करीत वडगाव (ता. तासगाव) व कवलापूर (ता. मिरज) येथील दोघा तरुणांना जेरबंद करण्यात यश मिळविले. त्यांच्याकडून ९ किलो ३०० ग्रॅम सोने हस्तगत करण्यात आले आहे. त्याची किंमत तब्बल ४ कोटी ७० लाख रुपये होते. अधिक तपासासाठी संचालनालयाच्या पथकाने शुक्रवारी वडगाव आणि कवलापुरात दिवसभर छापेमारी केली.

कारवाईविषयी पथकाने गुप्तता पाळली असून तरुणांची नावे उघड केली नाहीत. सोने तस्करीमागील आंतरराष्ट्रीय रॅकेटचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या शुक्रवारी (दि. २१) कर्नाटकात चित्रदुर्ग शहराजवळ अत्यंत थरारक पाठलाग करून सोन्याची तस्करी उधळून लावण्यात आली. केरळमधील वेगवेगळ्या विमानतळांवरून तस्करीच्या मार्गाने सोने आणले होते. आंध्र प्रदेशात हैदराबादमध्ये विक्री केली जाणार होती. त्यासाठी दोघे तस्कर एका मोटारीतून कर्नाटकमार्गे निघाले होते. महसूल व गुप्तचर संचालनालयाला याची माहिती मिळाली. चित्रदुर्गजवळ पथकाने सापळा रचला. त्यावेळी केरळ राज्याची नंबरप्लेट असणारी एक मोटार भरधाव निघाल्याचे दिसले.

पथकाने तिला अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु मोटारीने बॅरिकेट्स उडवून लावत पलायन केले. पथकाने अर्धा तास पाठलाग केला. हिरीयूरजवळ अडवण्यात यश आले. मोटारीत चालक आणि अन्य एक असे तीस वर्षे वयाचे दोघेजण होते. मोटारीच्या झाडाझडतीमध्ये सोन्याच्या ११ विटा सापडल्या. त्यांचे वजन ९ किलो ३०० ग्राम होते. किंमत तब्बल ४ कोटी ७० लाख होती. तस्करांना ताब्यात घेऊन शनिवारी बंगलुरूमध्ये नेण्यात आले.

चौकट

कवलापूर, वडगावात छापेमारी

संचालनालयाच्या पथकाने गुरुवारी (दि. २७) कवलापूर आणि वडगावमध्ये छापेमारी केली. त्यासाठी बंगलुरू व सांगलीतील प्रत्येकी पाच असे १० अधिकारी आले होते. सकाळी वडगावमध्ये व दुपारी कवलापुरात तरुणांच्या घरांत झाडाझडती घेतली. बँक पासबुक, मालमत्तेविषयक कागदपत्रे ताब्यात घेतली. काही मोठी रोकड सापडते काय, याचाही शोध घेतला. झाडाझडतीविषयी त्यांचे कुटुंबीय तसेच गावकरीही अनभिज्ञ होते.

चौकट

सराईत आंतरराष्ट्रीय तस्करी

तस्करीचे रॅकेट आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. केरळमध्ये वेगवेगळ्या विमानतळांवर टप्प्याटप्प्याने सोने उतरवले होते. सव्वानऊ किलोपर्यंतचा साठा झाल्यावर हैदराबादला विक्रीसाठी नेले जात होते. पथकाला मोटार पकडल्यानंतर सोने शोधण्यासाठी बरीच तपासणी करावी लागली. गाडीतील आसनांमध्ये सोने ठेवण्यासाठी विशेष कप्पे केल्याचे आढळले. त्यामुळे या गाडीतून सोन्याची नियमित तस्करी सुरू असल्याचा संशय आहे.

चौकट

अर्ध्या तासांचा जीवघेणा पाठलाग

चित्रदुर्गजवळ पथकाने इशारा केल्यानंतरही मोटार थांबली नाही. रस्त्यावरील बॅरिकेट्स उडवून चालकाने मोटार वेगाने दामटली. पथकाने भरपावसात अर्धा तास पाठलाग केला. हिरीयुरजवळ मोटार अडवण्यात यश आले. ताब्यात घेतलेले दोघेही मराठी असल्याचे आणि गलाई व्यवसायात असल्याचे पथकाला आढळले. तरुणांनी दिलेल्या जबाबात आंतरराष्ट्रीय मार्गांनी तस्करी करून सोने आणल्याचे कबूल केले आहे.

Web Title: Near Chitradurga, 59 kg of gold worth Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.