आटपाडीत खड्डे मुजवण्यासाठी राष्ट्रवादीच्या महिला आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:30 IST2021-08-25T04:30:59+5:302021-08-25T04:30:59+5:30
आठ दिवसांत खड्डे भरून देण्याचे ग्रामविकास अधिकारी यांनी दिले अभिवचन लोकमत न्यूज नेटवर्क आटपाडी : आटपाडी शहरातील रस्त्यावर पडलेले ...

आटपाडीत खड्डे मुजवण्यासाठी राष्ट्रवादीच्या महिला आक्रमक
आठ दिवसांत खड्डे भरून देण्याचे ग्रामविकास अधिकारी यांनी दिले अभिवचन
लोकमत न्यूज नेटवर्क
आटपाडी : आटपाडी शहरातील रस्त्यावर पडलेले खड्डे मुजवण्यासाठी राष्ट्रवादीच्या महिला आक्रमक झाल्या होत्या. तीन महिन्यांच्या कालावधितही काम न केल्याने ग्रामविकास अधिकाऱ्यांना बांगड्यांचा आहेर देण्यात येणार होता. दरम्यान, ग्रामविकास अधिकारी यांनी आठ दिवसांच्या आत खड्डे मुजवण्याचे लेखी आश्वासन दिल्याने महिला शांत झाल्या.
आटपाडी पंचायत समितीच्या पाठीमागील बाजूस मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असून, पंचायत समितीच्या शेजारीच असणारा दत्त भेळ ते शाकंभरी मंदिर परिसराकडे जाणाऱ्या रोडवर पावसाने अनेक मोठे खड्डे पडले आहेत. वाहनधारकांना वाहन चालवताना आपला जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागत आहे. येथे अनेक दुचाकींचे अपघात घडले आहेत. जिल्हा महिला राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षा अनिता पाटील यांनी आटपाडी शहरातील खड्डे मुजवण्यासाठी गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले होते. आटपाडीच्या ग्रामसेवकांना अनेकदा निवेदन देऊनही ते खड्डे मुजवत नसल्याने अनिता पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत ग्रामपंचायतीमध्ये जाऊन ग्रामविकास अधिकारी यांना बांगड्यांचा आहेर देण्याचा इशारा दिला होता.
संतप्त महिला ग्रामपंचायतीमध्ये गेल्यानंतर ग्रामविकास अधिकारी उपस्थित नव्हते. ग्रामविकास अधिकारी हे राजकीय दबावापोटी काम करत नसल्याचा आरोप अनिता पाटील यांनी केला. ग्रामपंचायत अंदाजपत्रक बनवायला दिले असून, ते आले नसल्याचे कारण ते सांगत होत. मात्र ग्रामपंचायतीने आतापर्यंत अनेक कामे ही विनाअंदाजपत्रकच केली आहेत, असा आरोप केला.
यावेळी सरपंच वृषाली पाटील, उपसरपंच अंकुश कोळेकर, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश मरगळे उपस्थित होते.
चौकट
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची अरेरावी
सरपंच वृषाली पाटील यांच्यासमोरच बसून एक युवक स्वतःला ग्रामपंचायतीचा कर्मचारी आहे, असे सांगत अनिता पाटील यांच्याशी हुज्जत घालत अरेरावीची भाषा बोलत होता. सरपंच व उपसरपंच त्या कर्मचाऱ्याकडे फक्त अगतिकतेने पाहत होते. सरपंच व उपसरपंच यांच्यासमोरच एका कर्मचाऱ्याची भाषा अरेरावीची होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
चौकट
ग्रामविकास अधिकारी यांनी आठ दिवसांच्या आत सर्व प्रशासकीय बाबी पूर्ण करून खड्डे बुजवण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. खड्डे न बुजवल्यास पुन्हा आक्रमक आंदोलन करणार आहोत.
- अनिता पाटील, उपाध्यक्ष, सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस.