राष्ट्रवादीच्या खजिनदारास धमकी
By Admin | Updated: May 25, 2015 00:31 IST2015-05-24T22:41:07+5:302015-05-25T00:31:33+5:30
सांगलीतील प्रकार : पाच लाखांची मागणी; तिघांविरुद्ध गुन्हा

राष्ट्रवादीच्या खजिनदारास धमकी
सांगली : जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे खजिनदार मुश्ताकअली मुनवरअली रंगरेज (वय ४८, रा. शिवाजी हौसिंग सोसायटी, वसंतदादा साखर कारखाना परिसर, सांगली) यांना घरात जाऊन पाच लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार शनिवारी रात्री साडेदहा वाजता घडला. खंडणीची रक्कम न दिल्यास संपूर्ण कुटुंबास ठार मारेन, अशी धमकीही देण्यात आली.
याप्रकरणी गुंड निसार नगारजी (वय ४५), आयुब बारगीर (३६, दोघे रा. खणभाग) व आयुब पटेल (३८, रेपे प्लॉट, पंचशीलनगर, सांगली) या तिघांविरुद्ध संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
संशयित निसार नगारजी, आयुब बारगीर व आयुब पटेल यांची रंगरेज यांच्याशी ओळख आहे. शनिवारी रात्री साडेदहा वाजता ते रंगरेज यांच्या घरी गेले. ओळख असल्याने रंगरेज यांनी त्यांना घरात घेतले. त्यानंतर संशयितांनी ‘कराडसे सलीम बात कर रहा है, बोलो’, असे म्हणून रंगेरज यांच्याकडे मोबाईल दिला. सलीमनामक व्यक्तीने ‘कराडसे सलीम बोल रहा हू, पाच लाख रुपये मेरे आदमीके पास दो’, असे सांगितले. रंगरेज यांनी ‘कसले पैसे, कशासाठी द्यायचे’, अशी विचारणा करताच सलीमने मोबाईल बंद केला. त्यानंतर रंगरेज यांनी संशयितांकडे ‘हा काय प्रकार आहे, हा सलीम कोण आहे’, अशी विचारणा केली. त्यावर संशयितांनी ‘आम्हाला पैशाची गरज आहे, तुम्हाला पाच लाख रुपये द्यावे लागतील, अन्यथा तुम्हाला व तुमच्या कुटुंबास जिवंत ठेवणार नाही’, अशी धमकी दिली. या प्रकारामुळे रंगरेज घाबरून गेले. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर दुसऱ्या मजल्यावरून त्यांचे भाऊ जमीर रंगरेज आले. त्यानंतर संशयितांनी पलायन केले. रंगरेज यांनी रात्री उशिरा संजयनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी निसार नगारजीसह तिघांविरुद्ध खंडणी व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)