इस्लामपुरात विकास आघाडीपुढे राष्ट्रवादीचे तगडे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:28 IST2021-08-27T04:28:57+5:302021-08-27T04:28:57+5:30
लोगो - नगरपालिका इमारत लोकमत न्यूज नेटवर्क/युनूस शेख इस्लामपूर : नगरपालिकेतील ३१ वर्षांच्या सत्तेविरोधातील नाराजीचा फायदा उठवत साडेचार वर्षांपूर्वी ...

इस्लामपुरात विकास आघाडीपुढे राष्ट्रवादीचे तगडे आव्हान
लोगो - नगरपालिका इमारत
लोकमत न्यूज नेटवर्क/युनूस शेख
इस्लामपूर : नगरपालिकेतील ३१ वर्षांच्या सत्तेविरोधातील नाराजीचा फायदा उठवत साडेचार वर्षांपूर्वी सत्तेवर आलेल्या विकास आघाडीपुढे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी टक्कर देऊन सत्ता टिकविण्याचे मोठे आव्हान आहे, तर सत्ता परत मिळविण्यासाठी राष्ट्रवादीकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू असल्याने येत्या निवडणुकीत टोकाचा राजकीय संघर्ष होणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केल्याने राजकीय वातावरण तापू लागले आहे. गेल्या निवडणुकीत १४ प्रभागांमधून २८ नगरसेवक निवडून आले. थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत विकास आघाडीच्या निशिकांत पाटील यांनी दिवंगत विजयभाऊ पाटील यांच्यावर मात केली होती. विकास आघाडीचे १३ नगरसेवक निवडून आले. राष्ट्रवादीचे १४ नगरसेवक आणि एका अपक्षाने पाठिंबा दिल्याने त्यांचे संख्याबळ १५ झाले. त्यामुळे शिक्षण समिती वगळता इतर सर्व समित्यांवर त्यांचे वर्चस्व राहिले.
आता शहरात २८ प्रभाग होणार आहेत. प्रभाग रचनेत आणखी दोन-तीन प्रभागांची नव्याने भर पडण्याची शक्यता आहे. मागील निवडणुकीत ५३ हजार ६४२ मतदारसंख्या होती. ती आता ५९ हजारांवर गेली आहे.
विकास आघाडीमध्ये नेत्यांची संख्या आणि त्यांच्या महत्त्वाकांक्षा मोठ्या असल्याने एकसंघता राहील का, याची शंका आहे. गेल्या निवडणुकीत नानासाहेब महाडिक, शिवाजीराव नाईक, राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांनी विकास आघाडीची भक्कम मोट बांधली होती. राज्यातील तत्कालीन युती सरकारची ताकदही त्यांना मिळाली होती. मात्र आता सत्तेचे राजकारण बदलले आहे.
आघाडीतील राहुल आणि सम्राट महाडिक गटाने भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याची मागणी केली आहे. आघाडीचे अध्यक्ष विक्रम पाटील मात्र विकास आघाडीच्या माध्यमातून लढण्यास अनुकूल आहेत. विकास आघाडीतील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंदराव पवार यांच्या गटाचे पाच सदस्य आहेत. आ. खोत आणि महाडिक गटाची जवळीक असल्याने आघाडीतील इतर घटक काय करतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे. नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्याशी खोत-महाडिक गटाचे वैमनस्य आहे.
राष्ट्रवादीला नगरपालिकेच्या सत्ता कामाचा दांडगा अनुभव आहे. जयंत पाटील यांच्यासारखे खमके नेतृत्व त्यांच्याकडे आहे. या वेळी ते ताकदीने निवडणूक खेळतील यामध्ये शंका नाही. राष्ट्रवादीलाही अंतर्गत कलहाची भीती आहे.
पालिकेला १५८ वर्षांची परंपरा आहे. घरपट्टी, पाणीपट्टी, नाट्यगृह, बहुउद्देशीय सभागृह, व्यापारी गाळे पालिकेच्या आर्थिक मिळकतीचे स्रोत आहेत. पालिकेचे वार्षिक उत्पन्न अंदाजे २० कोटी रुपये आहे.
चौकट
मोठ्या योजनांचे गाजर
भुयारी गटार, २४ बाय ७ पाणी योजना अशा मोठ्या योजनांचे गाजर दाखवत राष्ट्रवादीने १५ वर्षे सत्ता मिळविली होती. मात्र विकास आघाडीने सत्तेवर येताच भुयारी गटारसारख्या आव्हानात्मक कामाची सुरुवात केली आहे. सत्तेतील कुरबुरी आणि कोरोनाचे संकट यामुळे विकास आघाडीला भरीव काम करण्याची संधी मिळालेली नाही.