राष्ट्रवादीची भिस्त कार्यकर्त्यांवरच...
By Admin | Updated: July 30, 2015 00:30 IST2015-07-29T23:35:26+5:302015-07-30T00:30:20+5:30
तासगाव बाजार समिती निवडणूक : भाजप खासदारभरोसे, कॉँग्रेस तालुकाध्यक्षांचे एकला चलो रे...

राष्ट्रवादीची भिस्त कार्यकर्त्यांवरच...
दत्ता पाटील -तासगाव -तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदानासाठी काही दिवसच उरले आहेत. तिरंगी लढतीने प्रचारातही चुरस दिसून येत आहे. राष्ट्रवादीला आर. आर. पाटील यांची पोकळी जाणवत आहे. त्यामुळे या निवडणुकीत पहिल्यांदाच राष्ट्रवादीच्या प्रचाराची सारी भिस्त कार्यकर्त्यांवरच आहे. तसेच भाजपकडे तालुकास्तरावर सर्वव्यापी दुसरे नेतृत्व नसल्यामुळे प्रचाराची सारी भिस्त स्वत: खासदार संजयकाका पाटील यांच्यावर आहे. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांचा प्रचार ‘एकला चलो रे’ असाच असल्याचे दिसून येत आहे.
बिनविरोधची परंपरा असलेल्या तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा तीन पक्षांनी स्वतंत्र पॅनेल उभी केल्यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मतदानासाठी तीनच दिवस राहिल्यामुळे प्रचारात रंगत आली आहे. तालुक्यातील प्रत्येक सोसायटीचा संचालक, ग्रामपंचायतीचा सदस्य हा मतदानाचा केंद्रबिंंदू असल्यामुळे गावन् गाव पिंंजून काढले जात आहे.
आतापर्यंत निवडणुकांत राष्ट्रवादीसाठी पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचा एक दौरा प्रचारासाठी पुरेसा ठरायचा. मात्र त्यांच्या निधनामुळे या निवडणुकीत कार्यकर्त्यांना मोठी पोकळी जाणवत आहे. आमदार सुमनताई पाटील, स्मिता पाटील, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील हे स्वत: प्रचारात असले तरी, यावेळी पक्षाची सारी भिस्त कार्यकर्त्यांवरच आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हा बँकेचे आजी-माजी पदाधिकारी, पक्षाचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद गटनिहाय प्रचाराचे रान उठविले जात आहे. प्रचाराची यंत्रणा सक्षम असली तरी त्याचा मतदानात किती फायदा होईल, हे निकालानंतरच कळणार आहे.
भाजपचे खासदार संजय पाटील यांचा तालुक्यात मोठा गट आहे. मात्र खासदार पाटील यांच्याशिवाय तालुकास्तरावर काम केलेल्या नेत्यांची कमतरता आहे. तसेच त्यांच्या गटात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचीही कमतरता आहे. त्यामुळे भाजपच्या प्रचाराची सारी भिस्त स्वत: खासदार संजयकाका पाटील यांच्यावरच असल्याचे दिसून येत आहे. खासदार पाटील यांनी दोन दिवसांपासून जिल्हा परिषद गटनिहाय प्रचाराचा दौरा सुरु केला असून प्रत्येक गावातील मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी नियोजन केल्याचे दिसून येत आहे.
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांनी तालुक्यात पक्षाची मोठी ताकद किंवा कार्यकर्त्यांची फळी नसतानादेखील पॅनेल उभे केले आहे. त्यांना रसद देण्यासाठी जिल्हा पातळीवरूनही कोणाची मदत झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे या निवडणुकीत महादेव पाटील यांची भूमिका ‘एकला चलो रे’ अशीच सुरु आहे. त्यांनी मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे.
संजय पाटील यांचा विरोधक कोण?
काही वर्षांचा अपवाद वगळल्यास माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील आणि खासदार संजय पाटील हे एकमेकांचे पारंपरिक कट्टर विरोधक म्हणून ओळखले जायचे. तालुका, जिल्हा पातळीवरील कोणतीही निवडणूक असली तरी, या दोन्ही नेत्यांना आरोप-प्रत्यारोपांची जोरदार जुगलबंदी ठरलेली असायची. हे दोन्ही नेते एकमेकांविरोधात काय बोलणार? याची उत्सुकता दोघांच्या समर्थकांना असायची. मात्र सद्यस्थितीत आमदार सुमनताई पाटील यांचा राजकीय कागद कोरा आहे. त्यामुळे विरोधक म्हणून कोणावर हल्लाबोल करायचा? याबाबत खासदारांची कोंडी झाल्याचे दिसून येत असून, विरोधात दुसरे तोडीसतोड नेतृत्व नसल्याने या निवडणुकीत राजकीय जुगलबंदी दिसून आली नाही.