राष्ट्रवादीच्या धसक्याने खासगीकरण रद्द
By Admin | Updated: October 1, 2015 00:45 IST2015-09-30T23:40:35+5:302015-10-01T00:45:21+5:30
संजय बजाज : महापौरांवर टीका; जनतेच्या हितासाठी पाणी खासगीकरणास विरोध

राष्ट्रवादीच्या धसक्याने खासगीकरण रद्द
सांगली : महापालिका पाणी पुरवठ्याच्या खासगीकरणाविरोधात आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने मोर्चा काढला. त्याचा धसका घेऊनच सत्ताधारी व महापौरांनी खासगीकरणाचा बेत रद्द केला, असे प्रतिपादन शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत केले. बजाज म्हणाले की, महापौर विवेक कांबळे यांनी जयंत पाटील यांना घाबरत नसल्याचे सांगितले. आम्हाला घाबरण्याचेही काही कारण नाही. पण जयंतरावांनी महापालिकेच्या दारात जी जनता आणली, तिला ते घाबरले आणि पाणी पुरवठा खासगीकरणावरून यु टर्न घेतला. आता सत्ताधारी काहीही म्हणोत, पण त्यांनी राष्ट्रवादीच्या आंदोलनाचा धसका घेतल्याचे उघड झाले आहे.पाणी पुरवठा खासगीकरणाची कुणकुण लागताच आम्ही विरोधाची भूमिका घेतली होती. महासभेतही तीव्र विरोध केला. सभागृहातील ५४ नगरसेवक विरोधात असताना महापौरांनी हुकूमशाही पद्धतीने हा ठराव मंजूर केला होता. या ठरावावर आम्ही जनतेत गेलो. त्याच्या दृश्य परिणामांची जाणीव करून दिली. जनतेनेही मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आयुक्त अजिज कारचे यांनी या ठरावाची अंमलबजावणी करणार नाही, असे स्पष्ट केले होते. तेव्हाच आम्ही ९० टक्के लढाई जिंकली होती.
विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी यांनी इतिवृत्त मंजुरीवेळी मतदान घेण्याची मागणी केली. सत्ताधाऱ्यांतील बहुतांश नगरसेवकांनी खासगीकरणाविरोधात पत्रे दिली. महासभेच्या सभागृहात या ठरावाला वाढता विरोध होणार, सभागृह चालणार नाही, याची जाणीव झाल्यानेच त्यांनी ठराव मागे घेतला आहे. महापौरांच्या हुकूमशाहीला जनआंदोलनाने उत्तर दिल्याचेही बजाज म्हणाले. (प्रतिनिधी)
बीओटी होणार नाही
महापालिकेच्या काही जागा बीओटीवर विकसित करण्याचा घाट घातल्याबद्दल बजाज म्हणाले की, बीओटीबाबत अद्याप कोणताही प्रस्ताव समोर आलेला नाही. सत्ताधाऱ्यांतच त्यावर ताळमेळ नाही. बीओटीला आमचा विरोध आहेच. पण प्रस्ताव कसा येतो, त्यावर पुढील भूमिका घेऊ. सध्या तरी बीओटी होणार नाही, असेच वाटते.
पाचशे कोटी कसे?
आमदार सुधीर गाडगीळ यांनी महापालिकेत पाचशे कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला. त्यांनी कसा हिशेब केला आहे कुणास ठावूक! पालिकेचे उत्पन्न सव्वाशे कोटीचे. त्यातील पगार व खर्च वजा जाता वर्षाला वीस ते पंचवीस कोटी उरतात. त्या रकमेचा घोटाळा झाला तरी पाचशे कोटी होत नाहीत, असा टोलाही बजाज यांनी लगाविला.