इस्लामपूर नगरपालिकेत राष्ट्रवादीचे पानिपत नेहमीचेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:28 IST2021-02-24T04:28:17+5:302021-02-24T04:28:17+5:30
संजय कोरे, दादासाहेब पाटील अशोक पाटील लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : नगरपालिकेत राष्ट्रवादीचे संख्याबळ एकूण सदस्यांपैकी निम्मे आहे. पक्षबैठक ...

इस्लामपूर नगरपालिकेत राष्ट्रवादीचे पानिपत नेहमीचेच
संजय कोरे, दादासाहेब पाटील
अशोक पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : नगरपालिकेत राष्ट्रवादीचे संख्याबळ एकूण सदस्यांपैकी निम्मे आहे. पक्षबैठक बोलाविण्याचा अधिकार गटनेत्याला आहे. परंतु तेच गैरहजर असल्याने सभागृहात हजर राहण्याचा पक्षादेश काढणार कोण, हा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे सभागृहात राष्ट्रवादीचे नेहमीच पानिपत होत आहे.
नगरपालिकेत राष्ट्रवादीकडे निम्मे नगरसेवक असले तरी सत्ताधारी विकास आघाडीकडे थेट नगराध्यक्षपद आहे. परिणामी सत्ताधाऱ्यांचे संख्याबळ एका सदस्याने जास्त आहे. एकीकडे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर निष्ठा दाखवायची आणि दुसरीकडे मात्र पालिका सभागृहात सत्ताधाऱ्यांना अंतर्गत मदत करायची, असा कारभार गेली चार वर्षे विरोधी राष्ट्रवादीकडून सुरू आहे. ते आगामी पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला धोक्याचे ठरणार आहे. पालिकेत नेहमीच सत्ताधारी विकास आघाडी राष्ट्रवादीला धोबीपछाड देते आणि ठराव मंजूर करून घेते.
नगरपालिकेत यापूर्वीही असे झाले आहे. काही वर्षांपूर्वी आनंदराव मलगुंडे यांच्या गळ्यात पडलेली नगराध्यक्ष पदाची माळ म्हणजे राष्ट्रवादीतील गद्दारी आणि जयंत पाटील यांना दिलेला दगा होता.
सोमवार, २२ फेब्रुवारीरोजी झालेल्या सभेत महत्त्वाचे विषय असताना गटनेते संजय कोरे, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील यांची अनुपस्थिती राष्ट्रवादीच्या वजाबाकीचे कारण ठरले. विकास आघाडीचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी याचा फायदा घेऊन काही ठराव मंजूर केले. राष्ट्रवादीला बळकटी देण्यासाठी जयंत पाटील राज्यात पायपीट करीत आहेत. कोरोनामुळे मुंबईत क्वारंटाईन असतानाही त्यांनी सांगली महापालिकेत महापौरपद काबीज करून राष्ट्रवादीचा झेंडा फडकविला. परंतु त्यांच्या होम पीचवर म्हणजे इस्लामपूर नगरपालिकेत मात्र राष्ट्रवादीकडे खमके नेतृत्व नसल्याने सत्ताधारी विकास आघाडी वरचढ ठरत आहे.
चौकट
सत्ताधारी वरचढ का?
उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील बाहेरगावी असल्याचे त्यांच्या समर्थकांकडून सांगितले जाते, तर कोरोना वाढत असल्याने संजय कोरे यांनी होम क्वारंटाईन करून घेतल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे. त्यामुळे पालिकेच्या सभागृहात विकास आघाडीकडून राष्ट्रवादी चितपट होत आहे.