इस्लामपूरच्या विकासाला राष्ट्रवादीचा खो;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:06 IST2020-12-05T05:06:38+5:302020-12-05T05:06:38+5:30

इस्लामपूर : तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आदी दिग्गज नेत्यांच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून ...

NCP's loss to Islampur development; | इस्लामपूरच्या विकासाला राष्ट्रवादीचा खो;

इस्लामपूरच्या विकासाला राष्ट्रवादीचा खो;

इस्लामपूर : तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आदी दिग्गज नेत्यांच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून इस्लामपूर पालिकेत विकास आघाडीला यश मिळाले. विकास आघाडीने पहिल्या तीन वर्षांत विकासाच्या घोषणांचा पाऊस पाडला आणि तसे शासनाकडे प्रस्तावही पाठवले. परंतु राज्यात महाआघाडीची सत्ता आल्यानंतर शासनदरबारी विकासाच्या फायलीला राष्ट्रवादीनेच खो दिल्याची चर्चा पालिका वर्तुळातून आहे.

तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादीने शहराचा चौफेर विकास करण्याचा प्रयत्न केला. राज्यात १५ वर्षे काँग्रेस, राष्ट्रवादी यांची सत्ता होती. या मंत्रिमंडळात जयंत पाटील यांच्याकडे अर्थ, ग्रामविकास आणि गृह खात्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांच्याकडे अर्थखात्याचा पदभार जास्त काळ होता. या कालावधित इस्लामपूरच्या विकासाला कोट्यवधी रुपयांचा निधी मंत्री पाटील यांनी उपलब्ध करून दिला. परंतु या फंडातून नियोजनबद्ध विकास न केल्याने तीनतेरा वाजले आहेत.

तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादीने इस्लामपूरसाठी भुयारी गटार योजना, २४ तास पिण्याचे पाणी, रस्त्यांचे रुंदीकरण, नियोजित विकास आराखडा आदी योजना पूर्ण करण्याची आश्वासने इस्लामपूरच्या जनतेला दिली होती. परंतु पालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीविरोधी असलेल्या विकास आघाडीला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच ताकद देऊन पालिकेतील राष्ट्रवादीची सत्ता उलथवून टाकली. त्याचवेळी देवेंद्र फडणवीस यांनी, इस्लामपूरच्या विकासाला पैसा कमी पडू देणार नाही, अशी घोषणा केली होती. यापैकी फक्त भुयारी गटार योजनेला मंजुरी देण्यापलीकडे सत्ताधारी विकास आघाडीला काहीही मिळाले नाही.

दरम्यान, महाविकास आघाडीची सत्ता आणि जयंत पाटील हे नंबर दोनचे मंत्री म्हणून महाआघाडीत सामील झाले. त्यामुळे विकास आघाडीच्या घोषणेला राष्ट्रवादीच अडसर असल्याचे आरोप विकास आघाडीतून केले जात आहेत.

चौकट

जयंत पाटील यांच्याकडून अपेक्षा

गेले नऊ महिने राज्यात कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे केंद्राने व राज्याने विकासाच्या फंडावर बंधन आणले आहे. याचाच परिणाम शहराच्या विकासावर झाल्याचे दिसते. तरी सुद्धा जयंत पाटील हे मंत्रिमंडळात दोन नंबरचे मंत्री आहेत. त्यांनीही इस्लामपूरच्या विकासाला हातभार लावावा, अशी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे.

फोटो : इस्लामपुर नगरपालिका लोगो

Web Title: NCP's loss to Islampur development;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.