राष्ट्रवादीची गळती थांबता थांबेना...
By Admin | Updated: October 1, 2015 00:42 IST2015-09-30T23:49:44+5:302015-10-01T00:42:00+5:30
कवठेमहांकाळची स्थिती : वैशाली पाटील, शिवाजीराव चंदनशिवेंचा पक्षाला अलविदा

राष्ट्रवादीची गळती थांबता थांबेना...
कवठेमहांकाळ : राष्ट्रवादी नेते सुरेश पाटील, जि. प.चे बांधकाम सभापती गजानन कोठावळे आणि माजी सभापती सुरेखा कोळेकर यांच्या अहंकारीपणाला कंटाळून आपण खा. संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश करीत आहोत, अशी माहिती पंचायत समितीच्या सभापती वैशाली पाटील व पं. स. सदस्य शिवाजीराव चंदनशिवे यांनी बुधवारी दिली. या दोघांच्या पक्षप्रवेशामुळे कवठेमहांकाळ तालुक्यातील राष्ट्रवादीची गळती थांबता थांबेना.
आर. आर. पाटील यांचे निधन झाल्यानंतर कवठेमहांकाळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे जहाज बुडायला प्रारंभ झाला. त्यांच्या निधनाला सहा महिने उलटताच पंचायत समितीचे दोन माजी उपसभापती दादासाहेब कोळेकर व अनिल शिंदे, कवठेमहांकाळ राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष हायूम सावनूरकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी खा. संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशाला काही दिवस उलटून गेले आणि लगेचच कवठेमहांकाळ पंचायत समितीच्या सभापती वैशाली पाटील, सदस्य शिवाजीराव चंदनशिवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला अलविदा केले आहे. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे पंचायत समितीत कमळ फुलले आहे.
वैशाली पाटील व चंदनशिवे म्हणाले की, सुरेश पाटील, गजानन कोठावळे आणि सुरेखा कोळेकर यांच्या धोरणाला कंटाळून आपण हा पक्ष सोडत आहोत. पंचायत समितीत विकास कामे करताना या मंडळींनी वारंवार हस्तक्षेप केला. त्यामुळे विकासाची कामे रखडली. मग अशा पक्षात राहून काय उपयोग? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
खा. पाटील यांच्याशिवाय आता तासगाव, कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाला पर्याय नाही. म्हैसाळ व टेंभू पाणी योजना मार्गी लावण्याची शक्ती केवळ त्यांच्यातच असून, यापुढे त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही भाजपमध्ये काम करणार आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. (वार्ताहर)
समीकरणे बदलली...
वैशाली पाटील यांना राजीनामा देण्यासाठी दबावतंत्र वापरले गेले होते. राजीनामा द्या, अन्यथा अविश्वास ठराव दाखल करू, असा इशारा त्यांना दिला होता. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपमधील एका नेत्याशी हातमिळवणी करून पाटील यांच्यावर अविश्वास दाखल करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. त्यामुळे वैशाली पाटील यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता त्यांच्यासह तीन सदस्य असल्यामुळे त्यांच्यावरील अविश्वास ठराव दाखल होणे अशक्यप्राय झाले आहे.