राष्ट्रवादीचे वरातीमागून घोडे
By Admin | Updated: August 13, 2014 23:35 IST2014-08-13T22:58:10+5:302014-08-13T23:35:49+5:30
गोंधळनामा सुरूच : पक्ष सोडून गेल्यानंतर नोटिसा

राष्ट्रवादीचे वरातीमागून घोडे
सांगली : नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची गळती लागलेल्या जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा गोंधळनामा सुरूच आहे. राष्ट्रवादीला रामराम ठोकून अन्य पक्षात अधिकृतरित्या प्रवेश करणाऱ्यांना राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांमार्फत नोटिसा बजावल्या जात आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे घोडे सध्या वरातीमागून धावताना दिसत आहे.
जिल्ह्यातील राष्ट्रवादीला पक्षीय इतिहासातील सर्वात मोठी गळती लागली आहे. गेल्या दोन वर्षात अर्धा डझन नेत्यांची पक्षातून गच्छंती झाली. माजी महापौर इद्रिस नायकवडी, खासदार संजय पाटील, जतचे विलासराव जगताप, माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी आमदार अनिल बाबर, जिल्हा परिषद सदस्य भीमराव माने अशी यादी आता लांबतच चालली आहे. यातील इद्रिस नायकवडी, विलासराव जगताप यांची पक्षाने एका नोटिसीनंतर हकालपट्टी केली. इतर नेत्यांबाबत वेगळीच प्रक्रिया राबविण्यात आली. संजय पाटील यांना नोटीस बजावण्यात आली, पण नोटिसीला उत्तर देण्यापूर्वीच ते भाजपमध्ये दाखल झाले होते. शहर जिल्हाध्यक्ष दिनकर पाटील यांनी भाजपच्या मिरवणुकीत सहभाग घेतल्यानंतरही त्यांना कोणतीही नोटीस पक्षाने बजावली नाही. घोरपडेंनाही भाजपशी संगत केली म्हणून आजवर कोणतीही नोटीस बजावण्यात आलेली नाही. ही राष्ट्रवादीची राजकीय अगतिकता आहे.प्रत्येकाला वेगवेगळे नियम लावल्यामुळे राष्ट्रवादीच्या नियमावलीचाही गोंधळ दिसून येतो.
गृहमंत्री आर. आर. पाटील यांनीही नुकत्याच झालेल्या निर्धार मेळाव्यात पक्षातून बाहेर पडण्याच्या वाटेवर असलेल्या नेत्यांबद्दल संताप व्यक्त केला. अशा लोकांनी लवकरात लवकर पक्ष सोडावा, असा सल्ला पाटील यांनी दिला. त्यानंतर घोरपडेंनी त्यांच्या या सल्ल्याची खिल्ली उडविताना, आम्ही कधीच पक्ष सोडला आहे, हवी तर हकालपट्टी करा, असे सांगून टाकले. बाबर आणि भीमराव माने यांनी या गोष्टी सांगण्याचीही गरज नाही, कारण त्यांनी पक्ष केव्हाचाच सोडलेला आहे. तरीही जिल्हाध्यक्षांनी आता त्यांना नोटीस बजावली आहे. वरातीमागून चालणारे राष्ट्रवादीचे घोडे विधानसभेच्या मैदानात काय करणार?, असा सवाल आता कार्यकर्तेच उपस्थित करू लागले आहेत. (प्रतिनिधी)
उशिराची सोडचिठ्ठी
अनिल बाबर आणि भीमराव माने यांनी अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. दुसरा विवाह झाल्यानंतर आता पहिल्या विवाहासाठी सोडचिठ्ठीची नोटीस बजावण्यात आल्यासारखा हा प्रकार आहे! पक्षप्रवेशानंतर या नोटिसांना काय अर्थ आहे, असा सवाल राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमधून उपस्थित होत आहे.