कोकळे सोसायटीत राष्ट्रवादीचा धुव्वाआबा-दादा पॅनेलची बाजी
By Admin | Updated: December 17, 2015 23:19 IST2015-12-17T23:18:25+5:302015-12-17T23:19:34+5:30
तेरापैकी बारा जागांवर विजय

कोकळे सोसायटीत राष्ट्रवादीचा धुव्वाआबा-दादा पॅनेलची बाजी
कवठेमहांकाळ : संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधून घेतलेल्या कोकळे विकास सोसायटी निवडणुकीत दोन माजी मंत्र्यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थकांचा पराभव करून १३ पैकी १२ जागा जिंंकल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता उलथवून लावली.
कोकळे विकास सोसायटीसाठी बुधवारी मतदान होऊन मतमोजणी झाली. सभासदांनी माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांचे कट्टर समर्थक धनाजी पाटील आणि माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांचे समर्थक नंदकुमार पाटील यांच्या नेतृत्वाखालील आबा-दादा पॅनेलने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनेलला पराभूत केले.
आबा-दादा पॅनेलच्या सत्ता देऊन १२ जागा मिळवून दिल्या, तर याच सभासदांनी राष्ट्रवादी पॅनेलच्या पारड्यात अवघी एक जागा टाकली.
कोकळे विकास सोसायटीची निवडणूक लागल्यानंतर धनाजी पाटील, नंदकुमार पाटील या दोन कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन राष्ट्रवादीविरोधात पॅनेल उभे केले. ही निवडणूक कोण जिंंकणार? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. त्यामुळे सत्ताधारी जिंकणार, की विरोधक सत्ता खेचून आणणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. अखेर सभासदांनी ३५ वर्षांची सत्ता उलथवून टाकली आणि कोकळे विकास सोसायटीत चमत्कार घडविला.
कोकळ्यातील धनाजी पाटील, नंदकुमार पाटील या निवडणुकीत एकत्रित आले. त्यांनी एकदिलाने निवडणूक लढविण्याचा प्रयत्न करून सत्ता हस्तगत केली. याउलट राष्ट्रवादीचे महांकाली साखर कारखान्याचे माजी संचालक बळवंत पवार, विद्यमान संचालक बाळासाहेब ओलेकर, माजी संचालक सूर्यकांत पाटील, माजी अध्यक्ष पोपटराव पाटील यांच्यात एकी आढळून आली नाही. त्यामुळेच धनाजी आणि नंदकुमार या दोन कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीला अस्मान दाखविले.
रूपेश कदम, सतीश नागने, रमेश महाजन, धनाजी भोसले, भारत पांढरे, श्रीरंग ओलेकर, राजू अजेष्ठ, युवराज पाटील, विजय ओलेकर, बाळासाहेब जानकर या दिग्गज कार्यकर्त्यांनी धनाजी पाटील आणि नंदकुमार पाटील यांना मोलाची साथ दिली. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आबा-दादा पॅनेलच्या समर्थकांनी जल्लोष केला. (वार्ताहर)
राष्ट्रवादीच्या माने विजेत्या
कोकळे विकास सोसायटीच्या चुरशीच्या निवडणुकीत अजितराव घोरपडे आणि प्रतीक पाटील यांच्या गटाचे विक्रम कणसे, शहाजी पाटील, भास्कर पाटील, सचिन पाटील, हैबती पांढरे, बाळासाहेब शिंंदे, मधुकर माळी, दादासाहेब पवार, बाजीराव ओलेकर, मारुती लंगोटे, बाळासाहेब कांबळे, संपता ओलेकर हे विजय झाले, तर राष्ट्रवादीच्या मालन माने या एकमेव उमेदवार निवडून आल्या.