राष्ट्रवादीचे भगवान वाघमारे यांचे जिल्हा परिषद सदस्यत्व कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:56 IST2021-09-02T04:56:27+5:302021-09-02T04:56:27+5:30
मिरज : जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवेळी अनुपस्थित राहिल्याबद्दल जिल्हा राष्ट्रवादी काॅंग्रेसचे सदस्य भगवान तुकाराम वाघमारे (रा. ढालगाव) यांना अपात्र ...

राष्ट्रवादीचे भगवान वाघमारे यांचे जिल्हा परिषद सदस्यत्व कायम
मिरज : जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवेळी अनुपस्थित राहिल्याबद्दल जिल्हा राष्ट्रवादी काॅंग्रेसचे सदस्य भगवान तुकाराम वाघमारे (रा. ढालगाव) यांना अपात्र ठरविण्याची राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षनेत्यांची मागणी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी फेटाळली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा परिषदेतील पक्षनेते संजय पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सदस्य भगवान वाघमारे हे दि. २ जानेवारी २०२० रोजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीच्या बैठकीस अनुपस्थित राहिल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. वाघमारे यांनी मतदानास अनुपस्थित राहण्यासाठी पक्षाची पूर्वपरवानगी घेतली नसल्याने पक्षादेशाच्या उल्लंघनाबद्दल त्यांना अपात्र ठरविण्याची मागणी करण्यात आली होती.
संजय पाटील हे अधिकृत पक्षनेता नसून तथाकथित पक्षप्रमुखांनी काढलेला व्हीप बनावट असल्याचा बचाव वाघमारे यांनी केला. मतदानासाठी हजर राहणे व पक्षाच्या उमेदवारास मतदान करणे या दोन कारणांसाठी दोन स्वतंत्र व्हीप न काढता एकत्र व्हीप बेकायदेशीर आहे. निवडणुकीपूर्वी किमान दोन दिवस आधी पक्षादेश बजावणे बंधनकारक असल्याचा दावा वाघमारे यांच्यातर्फे ॲड आर. एम. वजीर यांनी केला. निवडणुकीत राष्ट्रवादी काॅंग्रेसतर्फे अध्यक्षपदासाठी अश्विनी नाईक व उपाध्यक्षपदासाठी जितेंद्र पाटील यांना मतदान करावे, असा पक्षादेश हाेता. प्रत्यक्षात मात्र या निवडणुकीत अश्विनी नाईक यांनी अध्यक्षपदासाठी निवडणूकच लढवली नाही. पक्षादेशाबाबत कायदेशीर बाबींची पूर्तता झाली नसल्याचे वाघमारे यांचे म्हणणे ग्राह्य धरून त्यांना अपात्र ठरविण्याची मागणी जिल्हाधिकारी अभिजित चाैधरी यांनी फेटाळली. यात विषेश म्हणजे राष्ट्रवादीने २ तारखेला पक्षादेश काढून १ तारखेला बजावल्याचे सुनावणीत निष्पन्न झाल्याने हा पक्षादेश रद्द ठरवून जिल्हाधिकाऱ्यांनी भगवान वाघमारे यांचे जिल्हा परिषद सदस्यत्व कायम ठेवले.
चाैकट
वैद्यकीय उपचारासाठी गाेव्याला..
अध्यक्ष निवडीपूर्वी भाजपचे सर्व सदस्य गोवा सहलीला गेले होते. यावेळी भगवान वाघमारे यांनाही आमदार गोपीचंद पडळकर यांनी गोव्याला पळवून नेल्याचा राष्ट्रवादीतर्फे तक्रार करण्यात आली होती, मात्र वाघमारे यांनी गोव्यात वैद्यकीय उपचारासाठी गेल्याचा बचाव केला.