इस्लामपुरात घरपट्टी वाढीवरून राष्ट्रवादीचा आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:21 IST2020-12-09T04:21:48+5:302020-12-09T04:21:48+5:30
इस्लामपूूर : इस्लामपूर नगरपालिकेने शहरातील नागरिकांना कराचा बोजा वाढवून दिलेली घरपट्टीची बिले मागे घ्यावीत. यापूर्वी मागीलवर्षी वाढीव घरपट्टीविरोधात अपील ...

इस्लामपुरात घरपट्टी वाढीवरून राष्ट्रवादीचा आंदोलनाचा इशारा
इस्लामपूूर : इस्लामपूर नगरपालिकेने शहरातील नागरिकांना कराचा बोजा वाढवून दिलेली घरपट्टीची बिले मागे घ्यावीत. यापूर्वी मागीलवर्षी वाढीव घरपट्टीविरोधात अपील दाखल केले आहे. कोरोनामुळे ज्यांना अपील दाखल करता आले नाही, त्यांना अपील दाखल करण्याची संधी द्या. या सर्व अपिलांवर निर्णय घेऊन मगच प्रशासनाने नवीन बिले द्यावीत अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजी नगराध्यक्ष अॅड. चिमण डांगे यांनी इस्लामपुरात पत्रकार परिषदेत दिला.
ते म्हणाले, नगरपालिकेने शहरवासीयांना मोठा धक्का दिला आहे. अन्यायी करवाढीची बिले दिली जात आहेत. नागरिकांमधून असंतोष व्यक्त होत आहे. प्रशासनाच्या या मनमानी कारभारावर सत्ताधारी काहीच बोलत नाहीत. त्यामुळे ही करवाढ त्यांना मान्य आहे का, असा प्रश्न उद्भवतो. शहरातील नागरिकांच्या हिताचे त्यांना सोयरसुतक नसल्याचे स्पष्ट होते. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या प्रभागनिहाय भेटीत नागरिक या करवाढीबद्दल संताप व्यक्त करत आहेत. पालिकेच्या या अवास्तव करवाढीमुळे शहरामध्ये राहणे मुश्किल झाले आहे. प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घ्यावी. मागीलवर्षीच्या सर्व अपिलांवर लवकर निर्णय घेत पुन्हा नव्याने नोटीस द्याव्यात. प्रशासनाने सलग दोन वर्षात करवाढ करून दिलेल्या नोटिसा मागे घ्याव्यात, अन्यथा नागरिकांच्या हितासाठी पालिकेसमोर लाक्षणिक उपोषण करू. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजी पाटील, नगरसेवक खंडेराव जाधव, विश्वास डांगे उपस्थित होते.