इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादी पोहोचवणार जनतेपर्यंत सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:56 IST2021-09-02T04:56:49+5:302021-09-02T04:56:49+5:30
इस्लामपूर : शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची संकल्पना व युवानेते प्रतीक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जयंत दारिद्र्य ...

इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादी पोहोचवणार जनतेपर्यंत सेवा
इस्लामपूर : शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची संकल्पना व युवानेते प्रतीक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानाच्या माध्यमातून संपूर्ण शहरात ‘कुटुंबाची जबाबदारी, योजना आपल्या दारी’ ही मोफत सेवा शिबिरे आयोजित केली आहेत. बुधवारी (दि. १) सकाळी १० वाजता मंत्री कॉलनीतील डायमंड हॉलपासून या शिबिराची सुरुवात करण्यात येत आहे. १३ ऑक्टोबर २०२१ला निनाईनगर येथे या शिबिराचा समारोप केला जाणार आहे. ही माहिती शहराध्यक्ष शहाजी पाटील यांनी दिली.
पाटील म्हणाले, शहरातील नागरिकांना विविध योजनांची माहिती मिळत नाही. तसेच पॅन कार्ड, आधार कार्ड व विविध दाखले काढताना अनेक अडचणी येतात. नागरिकांना हेलपाटे घालावे लागतात. त्यामध्ये त्यांचा वेळ, पैसा खर्च होऊनही बऱ्याच वेळा काम होत नाही. म्हणून शहरातील २० ठिकाणी त्या-त्या भागातील नागरिकांसाठी वेगवेगळ्या तारखांना ही शिबिरे आयोजित करून शहरातील नागरिकांना मोफत सेवा देत आहोत.
या शिबिरांमध्ये पॅन कार्ड, आधार कार्ड काढण्यात येणार असून, पूर्वीच्या पॅन कार्ड किंवा आधार कार्डमध्ये काही बदल करावयाचे असल्यास तेही करून दिले जाणार आहेत. या शिबिरामध्ये उत्पन्न, रहिवाशी, वयाचा, दिव्यांग व डोमेसाइल दाखले काढून दिले जाणार आहेत. तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजना, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ पेन्शन योजना, दिव्यांग, विधवा, परित्यक्ता, अनाथ मुले पेन्शन योजना आणि राष्ट्रीय कुटुंब योजनेची माहिती देऊन कागदपत्रांची पूर्तता करून घेतली जाणार आहे. या शिबिरांची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ५ अशी राहणार आहे.