Nilesh Lanke on Gopichand Padalkar: शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री जयंत पाटील यांच्याविषयी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद सांगलीत उमटत आहेत. शरद पवार यांनी फोन करुन नाराजी व्यक्त केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडळकर यांना समज दिली. मात्र त्यानंतरही गोपीचंद पडळकर वक्तव्यावर ठाम आहेत. पडळकरांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यासाठी शरद पवार गटातर्फे सांगलीत ‘संस्कृती बचाव मोर्चा’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार निलेश लंके यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर जोरदार हल्ला चढवत इशारा दिला.
"लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या बद्दल चुकीच्या पद्धतीने शब्द वापरले गेले. महाराष्ट्र हा संस्कृती पासून कुठेतरी लांब चाललेला आहे. मोर्चाला सुरुवात झाली तेव्हापासून लोकांमध्ये उद्रेक होता कारण ज्या व्यक्तीने एक पिढी घडवली त्याच्याबद्दल एक व्यक्ती येऊन बोलतो. म्हणून निषेधासाठी एवढी गर्दी जमा झाली आहे. या बोलणाऱ्यांचा जो आका आहे तो एसीत बसून सांगतो. जाती-जातीमध्ये भांडण लावून देतो, समाजामध्ये चांगले काम करणाऱ्यांबद्दल गरळ ओकायला लावतो. त्या आकालाच धडा शिकवला पाहिजे," असं निलेश लंके म्हणाले.
"यांच्याकडे द्यायला काही नाही. त्यामुळे लोकांमध्ये फूट पाडण्यासाठी हिंदू मुस्लिम केलं जात आहे. २०१४ च्या आधी आधी सर्वजण एकत्र येऊन सगळे सण साजरे करत होते. त्यानंतर असं काय अचानक झालं. राज्यामध्ये जातीजातीत संघर्ष निर्माण करून देण्याचे काम यांनी जाणीवपूर्वक केलं. शेतकऱ्यांवर, तरुण बेरोजगारांवर, बोलायला कोणीही तयार नाही. फक्त समाजामध्ये संघर्ष निर्माण करायचा. त्यांनी समाजात काही वाचाळवीर तयार करून ठेवले आहेत. जे गावागावात जाऊन गलिच्छ पद्धतीने बोलतात. त्यांना धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे. मी या सगळ्यांना सांगतो एकदा पोलीस बाजूला ठेवा आणि मग होऊन जाऊ द्या. जो वाचाळवीर बोलला तो पूर्वी दोन पोलीस घेऊन फिरत होता आता चार पोलीस घेऊन फिरत आहे. तुमच्यात दम असेल तर एकदा रणांगणात या. तुम्ही राहू नाहीतर आम्ही राहू. हे असे बालिश धंदे बंद करा," असेही निलेश लंके म्हणाले.
यावेळी आमदार रोहित पवार यांनीही पडळकरांवर निशाणा साधला. "गोपीचंद पडळकर म्हणजे बेन्टेक्सचे सोने आहे. हा विषय तालुका, जिल्ह्याचा नाही तर महाराष्ट्राचा आहे, महाराष्ट्र धर्माचा आहे. आम्हीही खालच्या पातळीवर जाऊन बोलू शकतो, पण आम्ही शब्दांची पातळी जपतो. काही लोक स्वतःला चाणक्य समजतात. यांच्या नेत्यांनी काही दिवसांपूर्वी जाहिराती दिल्या आहेत," अशी टीका रोहित पवार यांनी केली.