राष्ट्रवादीने भाजपमध्ये विलीन व्हावे
By Admin | Updated: October 23, 2014 00:08 IST2014-10-22T21:52:58+5:302014-10-23T00:08:59+5:30
भारत पाटणकर : लवकरच डाव्या पक्षांची मोट बांधणार

राष्ट्रवादीने भाजपमध्ये विलीन व्हावे
सांगली : राष्ट्रवादीची सध्याची वाटचाल पाहता, येत्या पाच वर्षात या पक्षाचे अस्तित्व शिल्लक राहणार नाही, असेच दिसत आहे. त्यामुळे त्यांनी केवळ भाजपमध्ये आपले लोक पाठविण्यापेक्षा संपूर्ण पक्षच भाजपमध्ये विलीन करावा, असे मत श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
ते म्हणाले की, सध्या राज्यात निर्माण झालेली त्रिशंकू अवस्था ही सर्व पक्षांवरील अविश्वासाचे प्रतीक आहे. सर्व पक्ष एकाच माळेचे मणी असल्याने आता आम्ही डाव्या पक्षांची मोट बांधणार आहोत. लोकांसमोर सक्षम पर्याय उभा राहील, यासाठी प्रयत्न केले जातील. श्रमिक मुक्ती दल कोणत्याही राजकीय निवडणुकांमध्ये भाग घेणार नाही. पण आमचे प्रतिनिधीत्व करू शकेल, असे डाव्या पक्षाचे उमेदवार आम्ही देण्याचा प्रयत्न करू. दलाने ज्या प्रश्नांवर आजवर लढा दिला आहे, त्या सर्व प्रश्नांना पक्षीय धोरणात समाविष्ट करण्याची आमची अट असेल. या अटीवर आम्ही यापुढे पर्याय निर्माण करू. दुष्काळी भागात पाणी देणाऱ्या योजनांची पाणीपट्टी वीजबिलासह लाभार्थ्यांकडून वसूल करण्यास आम्ही विरोध केला होता. तरीही शेतकरीविरोधी धोरणे राबविण्यात राष्ट्रवादी तसेच काँग्रेस नेत्यांनी पुढाकार घेतला होता. आता मोदींचाही अनुभव यापेक्षा भयानक असेल, असे दिसते.
राष्ट्रवादीची सध्याची वाटचाल पाहता, येत्या पाच वर्षांत हा पक्ष शिल्लक राहील की नाही, याची शंका वाटते. भाजपमध्ये राष्ट्रवादीचे अनेक लोक पाठविण्यात आले. उमेदवार उभे करून राष्ट्रवादी नेत्यांनी भाजपच्या उमेदवारांना पाठबळ दिले. त्यामुळे अशा एकाकी पडलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना आम्ही दत्तक घेतले. पलूस-कडेगावमध्ये सुरेखा लाड यांना जी मते मिळाली, ती श्रमिक मुक्ती दलाची आहेत. अन्य मतदारसंघातही राष्ट्रवादीच्या उमेदवारांना बळीचा बकरा बनविण्यात आले.
राष्ट्रवादीने असा छुपा पाठिंबा देण्याऐवजी पक्षच भाजपमध्ये नेला, तर जनतेची फसवणूक थांबेल व भ्रमही संपुष्टात येईल. काँग्रेसनेही हाच मार्ग अवलंबावा, अन्यथा जनविरोधी धोरणांबाबत त्यांनी जाहीर माफी मागून नव्या धोरणांचा विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)
शनिवारवाडा सजला कसा
पुण्याचा शनिवारवाडा म्हणजे आर्थिक व सामाजिक पिळवणुकीचे केंद्र आहे. असे असताना गेल्या अनेक वर्षात कधी या वाड्याकडे न पाहणाऱ्या लोकांनी अचानक यावर्षीच शनिवारवाडा सुशोभित केला, हे कशाचे संकेत आहेत?, असा सवालही पाटणकर यांनी यावेळी उपस्थित केला.