घोरपडे, अनिल बाबर यांना राष्ट्रवादीचे पुन्हा निमंत्रण
By Admin | Updated: August 9, 2014 00:29 IST2014-08-08T23:55:01+5:302014-08-09T00:29:42+5:30
कार्यकर्त्यांत उत्सुकता : पडझड रोखण्याचे प्रयत्न

घोरपडे, अनिल बाबर यांना राष्ट्रवादीचे पुन्हा निमंत्रण
सांगली : माजी मंत्री अजितराव घोरपडे व माजी आमदार अनिल बाबर यांच्यासह महायुतीच्या संपर्कात असलेल्या नेत्यांना गोंजारणे राष्ट्रवादीकडून सुरूच आहे. या नेत्यांना येत्या सोमवारी उपमुख्यमंंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सांगलीत होणाऱ्या मेळाव्याला निमंत्रण देण्यात आले असून, हे नेते उपस्थित राहणार का, याची उत्सुकता कार्यकर्त्यांना लागली आहे.
अजितराव घोरपडे यांनी तासगाव-कवठेमहांकाळमधून गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. भाजपकडून विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे, तर खानापूरचे नेते माजी आमदार अनिल बाबर यांनी नुकतीच शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यांचाही शिवसेनेतील प्रवेश निश्चित आहे. घोरपडे, बाबर यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक नेते महायुतीच्या संपर्कात आहेत. त्यात जिल्हा परिषद सदस्यांचाही समावेश आहे, पण अद्यापही या नेत्यांनी राष्ट्रवादीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या आजही ते राष्ट्रवादीत आहेत. त्यामुळे सोमवारी पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या मेळाव्यासाठी या नेत्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. याला अपवाद ठरले आहेत ते जतचे विलासराव जगताप. राष्ट्रवादीचा झेंडा खांद्यावर घेतलेल्या जगतापांनी लोकसभा निवडणुकीत भाजपचे संजय पाटील यांचा उघड प्रचार केला होता. त्यामुळे त्यांच्यावर पक्षाने निलंबनाची कारवाई केली आहे. आज (शुक्रवारी) राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांनी जगताप वगळता इतर नेत्यांना मेळाव्याचे निमंत्रण दिल्याचे सांगितले.
शिंदे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने जिल्ह्यात सर्व्हेक्षण केले आहे. पक्षाची ताकद वाढल्याने सांगली, मिरज आणि खानापूर-आटपाडी या तीन मतदारसंघांसाठी कार्यकर्ते आग्रही आहेत. प्रदेश समितीला जिल्ह्याचा अहवाल दिला आहे. (प्रतिनिधी)