इस्लामपूर : राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुशोभिकरणासाठी आणलेला दगडसुध्दा स्वत:च्या घराच्या सुशोभिकरणासाठी पळविला. अव्वाच्यासव्वा खर्च करूनही हे काम पूर्णत्वाकडे गेले नाही. मात्र विकास आघाडीने हेच काम पूर्ण करून शहराच्या विकासात भर घातली असल्यामुळे राष्ट्रवादीची पोटदुखी वाढली आहे. यातूनच दिशाभूल करण्याचा त्यांचा खटाटोप सुरू असल्याचा पलटवार विकास आघाडीचे उपाध्यक्ष नगरसेवक वैभव पवार यांनी केला.
पवार म्हणाले की, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुशोभीकरणाचे काम राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात सुरू झाले. मात्र हे काम त्यांना पूर्ण करता आले नाही. सुशोभीकरणासाठी आणलेला दगड राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने स्वत:च्या घराच्या सुशोभीकरणासाठी पळविला. मात्र डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सुशोभीकरणाचे काम रखडले. या दगडाची पळवापळवी कोणी केली ही कोणा ज्योतिषाने सांगायची गरज नाही. यावरून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांत संघर्ष पेटला होता. या संघर्षातच सुशोभीकरणाचे काम रखडले.
ते म्हणाले, विकास आघाडीने नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या साडेचार वर्षांत पारदर्शी कारभार करताना ३१ वर्षांचा मागील सत्ताधाऱ्यांचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आणल्याने राष्ट्रवादी सैरभैर झाली आहे. विकास आघाडीने निवडणुकीत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुशोभीकरणाचे काम पूर्ण करणार, असा शब्द दिला होता. तो आम्ही पूर्ण करून शहरवासीयांचा विश्वास संपादन केला हेच राष्ट्रवादीला जिव्हारी लागले आहे.