मांजर्डे मतदार संघावर राष्ट्रवादीचेच वर्चस्व
By Admin | Updated: July 13, 2015 00:33 IST2015-07-12T23:24:28+5:302015-07-13T00:33:19+5:30
भाजपचा अस्तित्वासाठी संघर्ष : संजयकाकांकडून पक्षबांधणीसाठी हालचाली

मांजर्डे मतदार संघावर राष्ट्रवादीचेच वर्चस्व
संजयकुमार चव्हाण -मांजर्डे तासगाव तालुक्यातील मांजर्डे जिल्हा परिषद मतदारसंघ लोकसंख्येने मोठा व जास्त मतदारसंख्या असलेला गण आहे. हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो. या गणातील काही गावे विसापूर सर्कलमध्ये, तर काही गावांचा तासगाव मतदार संघामध्ये समावेश असल्याने खानापूर, आटपाडी व तासगाव विधानसभा मतदार संघात या जि. प. गणाला वेगळे महत्त्व आले आहे.
या गणातून मांजर्डेचे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष दिनकरदादा पाटील, वायफळेचे ज्येष्ठ नेते साहेबराव दादा पाटील, हातनूरचे मोहनअण्णा पाटील, तसेच पेडचे पंचायत समिती सदस्य प्रभाकर पाटील यांचे वर्चस्व आहे. ही सर्व नेतेमंडळी आर. आर. पाटील आबा यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखली जातात. या मतदार संघात भाजप मात्र संघर्ष करताना दिसत आहे. खासदार संजयकाका पाटील यांचे समर्थक, वायफळेचे सुखदेव पाटील व हातनूरचे विलासभाऊ पाटील यांना संघर्ष करावा लागणार आहे. तालुका पातळीवर काही पदे नसल्याने भाजपचे कार्यकर्ते मात्र टिवल्या-बावल्या करतानाच दिसत आहेत.
सांगली जिल्हा बँकेत संचालक पद मांजर्डेचे कमलताई पाटील यांना, तर सूतगिरणीमध्ये पेडचे विलास खाडे यांची वर्णी लागली आहे. परंतु बाजार समितीसाठी या जि. प. गणातून इच्छुकांची गर्दी आहे. मागील पंचायत समितीला साहेबराव पाटील यांना डावलल्याने ते नाराज होते. त्यामुळे बाजार समितीवर निवड करून त्यांची नाराजी दूर केली होती.
यावेळीही साहेबरावदादा पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. बाजार समितीची निवडणूक बिनविरोध झाली तर साहेबराव पाटील यांचे नाव निश्चित मानले जात आहे, परंतु इच्छुक जास्त असल्याने नाराजांचा सामना राष्ट्रवादीला करावा लागणार आहे. किंदरवाडी, विजयनगर, कचरेवाडी, तरसेवाडी या गावातून बाजार समितीला इच्छुकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या गावातील कार्यकर्त्यांना थोपविण्यात वरिष्ठ नेत्यांची दमछाक होण्याची शक्यता आहे.
सुुभाषआप्पा पाटील यांनी राष्ट्रवादीशी फारकत घेऊन मागील विधानसभेत अपक्ष उमेदवारी लढविल्याने हातनूर गावाला तालुक्याच्या राजकारणात डावलले जात आहे, असे दिसते.
बाजार समितीच्या तसेच स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुकीच्या माध्यमातून या भागातील राजकीय समीकरणे ठरणार आहेत. मांजर्डेचे दिनकरदादा पाटील हे सध्यातरी या गणाचे नेतृत्व करीत आहेत. या जि. प. गणातील महत्त्वाचे निर्णय दिनकरदादा पाटील हेच घेतात. नाराजांना शांत बसविण्यात त्यांना कसरत करावी लागणार आहे.
भाजपच्या बांधणीसाठी खासदार संजयकाका पाटील यांनी वायफळचे सुखदेव पाटील यांना जिल्हा नियोजन समितीवर घेतले आहे. आमदार अनिल बाबर यांचाही एक नवीन गट या भागात तयार होत आहे. राष्ट्रवादीची नाराज आणखी काही मंडळी गळाला लागतील काय, यावर त्यांचे लक्ष आहे.