‘मॉर्निंग वॉक’वाल्यांच्या सलाईनमधून निसर्गप्रेमाचे ठिबक

By Admin | Updated: April 23, 2015 00:38 IST2015-04-22T22:44:08+5:302015-04-23T00:38:37+5:30

सांगलीतील उपक्रम : शंभरावर झाडे जगविली, ओसाड जागेवर फुलणार हिरवाई...गुड न्यूज

Nativity spell from 'morning walk' salain | ‘मॉर्निंग वॉक’वाल्यांच्या सलाईनमधून निसर्गप्रेमाचे ठिबक

‘मॉर्निंग वॉक’वाल्यांच्या सलाईनमधून निसर्गप्रेमाचे ठिबक

अंजर अथणीकर - सांगली  निसर्गाच्या संगतीने ज्यांचा दिवस उजाडतो, अशा लोकांनी निसर्गाप्रती उतराई म्हणून एक वेगळा उपक्रम सांगलीत सुरू केला. चर्चा, गाजावाजा न करता केवळ कर्तव्यभावनेतून त्यांनी जागा मिळेल तिथे वृक्षलागवडीचे काम हाती घेतले. निसर्गाच्या कुशीतच वसलेल्या विलिंग्डन महाविद्यालयाच्या परिसरात अनेकठिकाणी ओसाड भाग त्यांना दिसत होता. महाविद्यालय प्रशासनाची परवानगी घेऊन त्यांनी शंभरावर वृक्षलागवड केली. सलाईनच्या वापरातून त्यांनी ठिबक पद्धतीने ही झाडे जगविली आहेत.
विलिंग्डन महाविद्यालयाच्या परिसरात श्रीधर धामणीकर, नंदकुमार धामणीकर, गजानन मडीवाळ, डॉ. सचिन उदगावे, डॉ. सौ. उदगावे, मंदा करंदवाडीकर, डॉ. संतोष कल्लोळी, दत्तात्रय हेरडे, दीपक कुंभार, दीपक बाशेल आदी २० ते २५ ज्येष्ठ नागरिक या परिसरात सकाळी फिरण्यास जातात. या परिसरात वृक्ष नसल्यामुळे परिसर तसा ओसाड दिसत होता. त्यामुळे या परिसरात वृक्ष लागवड करावी, अशी कल्पना त्यांना सुचली. रोज फिरत असताना याबाबत चर्चा होत असे. शेवटी एक दिवस सर्वांनी थांबून याबाबत निर्णय घेतला. अनेकांनी आपआपली जबाबदारी उचलण्याचे निश्चित केले.
विलिंग्डन महाविद्यालयाचे प्राचार्य भास्कर ताम्हणकर यांची सर्वांनी भेट दिली. आपल्या परिसरात वृक्ष लागवड झाल्यास आपण स्वागतच करू, असे त्यांनी सांगितल्यानंतर प्रत्येकाने चार ते सहा वृक्षांची जबाबदारी घेऊन संपूर्ण क्रीडांगणाच्या बाहेरील बाजूने शंभरहून अधिक वृक्षलागवड केली. यामध्ये आंबा, वड, पिंपळ, बदाम आदी वृक्षांचा समावेश आहे. केवळ वृक्ष लागवड न करता त्यासाठी कुंपणही केले आहे. पावसाळा कसाबसा पार पडला. आता उन्हाची तीव्रता सुरू झाली आहे. यामध्ये झाडे टिकणार नाहीत, असे गृहीत धरून सर्वांनी वृक्षालगत सलाईनची बाटली लावून ठिबक पध्दतीने पाणी पुरवठा सुरू केला आहे. मॉर्निंगवॉकला जाणारे घरातून निघतानाच पाच ते सहा लिटरच्या कॅनमध्ये पाणी घेऊन जातात. आपआपल्या वृक्षाभोवती असलेल्या सलाईनच्या बाटलीत पाणी ओततात. त्यामुळे वृक्षांना दिवसभर ठिबक पध्दतीने पाणी पुरवठा होतो. यामुळे या वृक्षांचीही चांगली जोपासना झाली आहे. गेली वर्षभर हा ज्येष्ठ नागरिकांचा उपक्रम सुरू आहे. शासनाच्या वृक्ष लागवडीमध्ये दररोज हजारो वृक्षांची उन्हाच्या तीव्रतेत मर होत असताना, या ज्येष्ठांनी मात्र वृक्ष संगोपन कसे करावे, याचा आदर्श घालून दिला आहे.

आपण फिरावयास जाणारा परिसर प्रसन्न व हिरवागार असावा, यासाठी आपल्या सहकाऱ्यांना वृक्ष लागवडीची कल्पना सुचली. प्रत्येकाने वर्गणी काढली. आपण पाण्यासाठी सर्वांना कॅन पुरवले. वृक्ष लागवडीतूनही आपणाला आनंद मिळत आहे.
- दिलीप धामणीकर, वृक्षप्रेमी, सांगली

Web Title: Nativity spell from 'morning walk' salain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.