तासगावच्या समस्यांसाठी राष्ट्रवादी रस्त्यावर

By Admin | Updated: November 27, 2015 00:10 IST2015-11-26T23:41:34+5:302015-11-27T00:10:35+5:30

भाजप सरकारवर हल्लाबोल : मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

Nationalist street on Tasgaon issues | तासगावच्या समस्यांसाठी राष्ट्रवादी रस्त्यावर

तासगावच्या समस्यांसाठी राष्ट्रवादी रस्त्यावर

तासगाव : तासगाव तालुका दुष्काळी जाहीर करावा, रखडलेल्या पाणी योजना पूर्ण करुन तातडीने पाणी सोडावे, यासह अन्य मागण्यांसाठी तासगाव तालुक्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गुरुवारी रस्त्यावर उतरले. आमदार सुमनताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देत, भाजप सरकारवर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हल्लाबोल केला. मोर्चात तालुक्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
तासगाव तालुका दुष्काळी जाहीर करावा, दुष्काळाच्या सवलती त्वरित उपलब्ध करुन द्याव्यात, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जे माफ करावीत, ताकारी, म्हैसाळ, आरफळ, टेंभू, विसापूर, पुणदी आणि गव्हाण उपसा सिंचन योजनांची बिले टंचाई निधीतून भरुन, या योजना तात्काळ सुरु कराव्यात, शेतकऱ्यांची सर्व वीज बिले आणि कर माफ करावा, विद्यार्थ्यांचे सर्व प्रकारचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, बसचा मोफत पास द्यावा, जनावरांसाठी चारा छावण्या सुरु कराव्यात, पिण्याच्या पाणी योजनांची वीज बिले माफ करावीत. ज्येष्ठ शेतकऱ्यांना मासिक पेन्शन योजना सुरु करावी, दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्याची नुकसानभरपाई द्यावी, घरपट्टी, पाणीपट्टी माफ करावी, सौरऊर्जेवर शेती पंपास अनुदान द्यावे, तालुक्यातील बेकायदा धंदे बंद करावेत, वृध्द कलाकारांना पेन्शन सुरु करावी, स्वस्त धान्य दुकानातील धान्य पुरवठा सुरळीत करावा, यासाठी हा मोर्चा काढण्यात आला.
गुरुवारी साडेअकरा वाजता मार्केट यार्डपासून मोर्चाला सुरुवात झाली. बसस्थानक चौकातून गणपती मंदिरापासून तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. मोर्चात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तहसील कार्यालयाच्या आवारात मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. यावेळी बोलताना स्मिता पाटील म्हणाल्या, यापूर्वी आबांवर आरोप करणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी कोणाच्या बापाकडून नव्हे, तर शासनाकडून निधी आणून पाणी योजना सुरु कराव्यात. दहा वर्षे आमदार असतानाही ज्यांना पाया भक्कम करता आला नाही, त्यांना ग्रामपंचायत निवडणुकीत गावा-गावात फिरण्याची वेळ आली. मुख्यमंत्री तालुक्यात येऊन गेले, मात्र त्यांनी विकासासाठी काहीच निधी दिला नाही. शेतकऱ्यांचे जगणे महाग आणि मरण स्वस्त झाले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर आबांचे कुटुंबीय शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी बेमुदत उपोषण करेल.
बाजार समितीचे सभापती अविनाश पाटील म्हणाले, भाजप सरकारने अच्छे दिनचे गाजर दाखवले. प्रत्यक्षात मात्र लोकांना बुरे दिनचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे जुने दिवसच चांगले म्हणण्याची वेळ आली आहे. तालुक्यात यावर्षी द्राक्षाचे पीक चांगले आहे. हे पीक हाताशी आले तर शेतकरी कर्जमुक्तही होईल. मात्र त्यासाठी तालुक्यातील पाणी योजना कार्यान्वित व्हायला हव्यात. मात्र तालुक्यातील भाजपच्या नेत्यांना निधी खर्च करण्यात पूर्ण अपयश आले आहे. भाजपच्या नेत्यांकडून निधीबाबत केवळ घोषणा केल्या आहेत. खासदारांनी निधी खर्च करून दाखवावा. पश्चिम महाराष्ट्राच्या विकासासाठी भाजपला हद्दपार करायला हवे. त्यासाठी आमदार सुमनताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने आवाज उठवला जाईल.
मागण्यांचे निवदेन आमदार सुमनताई पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी तहसीलदार सुधाकर भोसले यांच्याकडे दिले. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील, पंचायत समितीचे सभापती सुनीता पाटील, संभाजी पाटील, गजानन खुजट, एम. बी. पवार, शंकरदादा पाटील, ताजुद्दीन तांबोळी, राहुल कांबळे, यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)


पहिलाच मोर्चा : राष्ट्रवादी रस्त्यावर
राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. तेव्हापासून मागील वर्षापर्यंत हा पक्ष आणि पर्यायाने तालुक्यातील राष्ट्रवादीचे कारभारी सत्ताधारी पक्षात होते. मात्र आता विरोधी पक्षात असल्याने जनतेच्या प्रश्नांबाबत आवाज उठवण्यासाठी राष्ट्रवादीने काढलेला तालुक्यातील हा पहिलाचा मोर्चा ठरला. आबांच्या पश्चात हा मोर्चा यशस्वी ठरणार का? याबाबत उत्सुकता होती.


चिंंचणीत लाखाचा मटका
भाजप सरकारच्या काळात तालुक्यात अवैद्य धंद्यांना ऊत आला आहे. शेतकरी, रोजगारी लोक मटक्याच्या नादी लागल्यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत, असा आरोप बाजार समितीचे सभापती अविनाश पाटील यांनी केला. माझ्या स्वत:च्या चिंचणी गावात रोज एक लाख रुपयांचा मटका घेतला जात असून, अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत असल्याची टीकाही पाटील यांनी केली.


राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधींची, नाराजांची दांडी
राष्ट्रवादीच्या गुरुवारी झालेल्या मोर्चात अपवाद वगळता जिल्हा परिषद सदस्या, पंचायत समिती सदस्यांनी दांडी मारली होती, तर राष्ट्रवादीत नाराज असलेल्या सुनील पाटील, वसंत सावंत, किशोर उनउने यांनीही या मोर्चाकडे पाठ फिरवली होती.

Web Title: Nationalist street on Tasgaon issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.