राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांत बाचाबाची
By Admin | Updated: August 27, 2014 23:18 IST2014-08-27T22:55:13+5:302014-08-27T23:18:54+5:30
बोरगावात जयंतरावांचे मौन : समोर प्रकार घडूनही कानाडोळा; अंगावर जाण्याचाही प्रकार

राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांत बाचाबाची
नितीन पाटील-बोरगाव --(ता. वाळवा) येथील गावभेटीच्या दौऱ्यात ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्यासमोरच राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांत शाब्दिक वादावादी होऊन अंगावर जाण्याचा प्रकार घडला. मात्र या गोंधळावेळी जयंतरावांनी कोणताही हस्तक्षेप न करता मौन पाळणे पसंत केले. यामुळे कार्यकर्ते, पदाधिकारी संभ्रमात पडले.
सोमवार, दि. २५ रोजी रात्री १० वाजता येथील प्रभाग क्र. २ मध्ये जयंतराव आले होते. ग्राहक पंचायत सदस्य आनंदराव शिंदे यांनी वीज कंपनीचा कारभार, ग्राहकांना बसणारा फटका व शिवाजी चौकातील ब्लॉकचे निकृष्ट काम याबाबात प्रश्न उपस्थित केले. मात्र राजारामबापू बँकेचे संचालक माणिकराव पाटील यांनी शिंदे यांना बोलण्यासाठी मज्जाव केला. यावर शिंदे यांनी जनतेचे प्रश्न मांडू शकतो, असे प्रत्युत्तर दिले. संचालक पाटील यांनी चिडून आधी राजारामबापू बँकेचे थकित कर्ज भरा, मगच जनता दरबारात बोलायला या, असे म्हणताच शिंदे यांनी पाटील यांना ‘हा माझा व्यक्तिगत प्रश्न आहे. तो जनतेपुढे घेऊ नका, नाही तर तुमची अंडीपिल्ली बाहेर काढायला मलाही वेळ लागणार नाही,’ असे सुनावले. त्यावर माणिक पाटील यांनी ‘सभेच्या बाहेर या, दाखवतो’, असा दम दिला. शिंदे यांनी ‘मला मारणार आहात का?’ अशी विचारणा केल्यावर जयंतरावांच्या समक्षच दोघे एकमेकांच्या अंगावर धावून गेले.
राष्ट्रवादीच्या या दोघा पदाधिकाऱ्यांत हा प्रकार सुरू असताना जयंतरावांनी मात्र यावेळी मौन पाळले. काही वेळानंतर अन्य नेत्यांच्या मध्यस्थीने या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला. मात्र या वादाची चर्चा तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली. जयंतरावांनी अशा उतावीळ पदाधिकाऱ्यांवर अंकुश आणावा, असे बोलले जात आहे. (वार्ताहर)