‘महांकाली’त राष्ट्रवादी-महायुतीचा सामना

By Admin | Updated: September 11, 2014 00:08 IST2014-09-10T23:03:49+5:302014-09-11T00:08:34+5:30

दोघे बिनविरोध : घोरपडे-शेंडगे-काका गटाचे आबा-सगरेंना आव्हान

Nationalist-Mahayuti face in 'Mahankali' | ‘महांकाली’त राष्ट्रवादी-महायुतीचा सामना

‘महांकाली’त राष्ट्रवादी-महायुतीचा सामना

कवठेमहांकाळ : महांकाली साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी १५ जागांकरिता २३ उमेदवार रिंगणात उतरले असून, गृहमंत्री आर. आर. पाटील (आबा) व महांकाली साखर कारखान्याचे अध्यक्ष विजय सगरे यांच्याविरुध्द माजी मंत्री अजितराव घोरपडे, खासदार संजयकाका पाटील, शिवसेनेचे नेते जयसिंगराव शेंडगे यांच्या पॅनेलचा सामना होणार आहे. ही लढत राष्ट्रवादी विरुध्द महायुती अशीच समजली जात आहे. सत्ताधारी सगरे पॅनेलविरोधात विरोधकांना पुरेसे उमेदवारही मिळू शकलेले नाहीत, तर सत्ताधारी पॅनेलचे गणपती सगरे (मालक) व रामचंद्र जगताप हे विद्यमान संचालक पुन्हा बिनविरोध निवडून आले आहेत.
महांकाली साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा बुधवारी अखेरचा दिवस होता. सतरा जागांसाठी एकूण ९६ उमेदवारांनी अर्ज भरले होते. छाननीत ४७ अर्ज बाद झाले आणि ३७ अर्ज शिल्लक होते. त्यापैकी १४ जणांनी बुधवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे १५ जागांसाठी २३ अर्ज शिल्लक राहिले. बिगर उत्पादक गटातून विद्यमान संचालक गणपती सगरे व अनुसूचित जाती गटामधून रामचंद्र जगताप बिनविरोध निवडून आले आहेत.
निवडणूक बिनविरोध होणार की नाही, याबाबत काही दिवसांपासून चर्चा होती. बुधवारी निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. सत्ताधारी सगरे पॅनेलच्या विरोधात विरोधकांना एकास एक उमेदवार मिळू शकला नाही. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी होत असल्याचे दिसत आहे. सत्ताधारी पॅनेलने १५ जागांसाठी १५ उमेदवार उभे केले आहेत, तर विरोधकांचे अवघे ८ उमेदवार या १५ जणांशी लढत देत आहेत. वास्तविक दोन्ही पॅनेलच्या नेत्यांनी चर्चा करून निवडणूक बिनविरोध करणे आवश्यक होते, शिवाय कारखान्याचा खर्च वाचला असता, असे बोलले जात आहे.
गृहमंत्री पाटील व विजय सगरे यांच्या पॅनेलविरुध्द घोरपडे, खा. पाटील, जयसिंग शेंडगे पॅनेल अशी लढत होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Nationalist-Mahayuti face in 'Mahankali'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.