काँग्रेसच्या दुबळेपणामुळे राष्ट्रवादीची शिरजोरी
By Admin | Updated: August 6, 2015 22:59 IST2015-08-06T22:59:27+5:302015-08-06T22:59:27+5:30
वाळवा-शिराळ्यातील चित्र : भाजप, शिवसेना, शेतकरी संघटनांचे पक्षीय नेते अस्वस्थ

काँग्रेसच्या दुबळेपणामुळे राष्ट्रवादीची शिरजोरी
अशोक पाटील- इस्लामपूरआमदार जयंत पाटील जिल्ह्यावरील पकड मजबूत करू लागले आहेत, परंतु केंद्रात व राज्यात त्यांची सत्ता नाही. शिराळ्याचे आमदार भाजपची सत्ता असूनही मंत्रीपद मिळविण्यासाठी कोअर कमिटीच्या दारात उभे आहेत. माजी मंत्री अण्णासाहेब डांगे राष्ट्रवादीच्या वळचणीला जाऊन बसले, त्यामुळे ज्येष्ठ असूनही त्यांना जयंत पाटील यांचे नेतृत्व मानावे लागत आहे. काँग्रेसचे सत्यजित देशमुख राष्ट्रवादीची कास धरून आहेत. नानासाहेब महाडिक यांना पक्ष नाही. शिवसेनेला नेता नाही. मनसेची तर वाताहतच झाली आहे. खासदार राजू शेट्टी यांच्या शेतकरी संघटनेची दाणादाण उडाली आहे. त्यामुळे हे सर्वच नेते सध्या अस्वस्थ आहेत.जयंत पाटील जिल्ह्यावरील पकड मजबूत करण्यासाठी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदाचा फायदा उठवण्याचा डाव खेळत आहेत. परंतु काँग्रेसचे ज्येष्ठ माजी मंत्री पतंगराव कदम यांनी ढासळलेल्या काँग्रेसला पुन्हा ऊर्जा देण्यासाठी जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादीला आव्हान दिले आहे. त्यामुळे पाटीलही अस्वस्थ झाले आहेत. अण्णासाहेब डांगे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार पवार यांच्या गोटात जाऊन बसले आहेत. परंतु स्थानिक पातळीवर जयंत पाटील यांचे नेतृत्व मानून काम करावे लागत आहे. राष्ट्रवादीने त्यांना पंढरपूर देवस्थानचे अध्यक्षपद आणि त्यांचे चिरंजीव अॅड. चिमण डांगे यांना नगराध्यक्षपद यापलीकडे काहीही दिलेले नाही. अशीच अवस्था माजी आमदार मानसिंगराव नाईक यांची झाली आहे. ते जयंत पाटील यांचे नेतृत्व मानतात, परंतु काँग्रेसच्या सत्यजित देशमुख यांना सोबतीला घेतल्याशिवाय आमदार शिवाजीराव नाईक यांच्याविरोधात ते काहीही करू शकत नाहीत. जनतेने शिवाजीराव नाईक यांना विजयी केले असले तरी, नाईक भाजपकडील मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत अस्वस्थ होऊन मुंबईच्या वाऱ्या करत आहेत.वाळवा-शिराळ्यातील साखरसम्राटांचा सहकारी संस्थांवर दबदबा आहे. या दोन तालुक्यातील रोजगाऱ्यांच्या हाताला काम, ऊस उत्पादकांना दर देण्यासाठी प्रामुख्याने जयंत पाटील, मानसिंगराव नाईक, वैभव नायकवडी यांनी प्रयत्न केले आहेत, तर अण्णासाहेब डांगे यांनी सूतगिरणी, शिक्षक क्षेत्रात पाया मजबूत केला आहे. शिवाजीराव नाईक, सत्यजित देशमुख सहकारी क्षेत्रात बॅकफूटवर आहेत. ऊस उत्पादकांच्या ताकदीवर खासदार राजू शेट्टी यांनी भाजपचा सोगा धरून काहीतरी पदरात पाडून घेण्याचा डाव आखला आहे. परंतु हे करताना स्वत:च्या लोकप्रियतेची ताकद कमी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आलेले नाही. सदाभाऊ खोत मंत्री झाले, तर खोत यांची ताकद वाढेल म्हणून संघटनेतील नेतेच त्यांचे अडसर बनले आहेत. शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांचे राजू शेट्टी शिष्य आहेत. पाटील यांच्यावर चिखलफेक करीत आपणच शेतकऱ्यांचे सच्चे नेते आहोत, असा दिखावा ते करत आहेत. त्यामुळे शेतकरी संघटनेतील कार्यकर्त्यांची वाताहत होत चालली आहे.पेठनाक्यावरील नानासाहेब महाडिक यांच्यासाठी आमदारकी मृगजळ ठरले आहे. जिल्ह्यातील नेते स्वत:च्या स्वार्थासाठी ‘नाना’ यांच्या ताकदीचा वापर करीत आहेत. त्यामुळे नाना म्हणतील तो पक्ष असे समीकरण झाले आहे. पेठनाक्यावरील साम, दाम, दंडाची परंपरा बंद करून त्यांचे चिरंजीव राहुल महाडिक शिक्षण क्षेत्रात जम बसवून राजकारणात ठसा उमटविण्याच्या प्रयत्नात आहेत, तर दुसरे चिरंजीव जि. प. सदस्य सम्राट यांनी वाळवा-शिराळ्यात युवकांना एकत्र करून विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे.
भाजप, शिवसेना, मनसेची अवस्था नायक नसलेली झाली आहे. शिवाजीराव नाईक भाजपचे आमदार आहेत. त्यांना केवळ त्यांचेच कार्यकर्ते मानतात. पूर्वाश्रमीचे भाजपचे कार्यकर्ते त्यांचे नेतृत्व मानत नाहीत.
काँग्रेसच्या दुफळीचा राष्ट्रवादीला फायदा
काँग्रेसची ताकद राष्ट्रवादीला शह देण्यासाठी पुरेशी असली तरी, त्यांच्यात एकी नसल्याने दुही माजली आहे. याचा फायदा राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील उठवत आहेत.
भाजपमध्येही दुफळी आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, नगरसेवक आनंदराव पवार हे पक्ष डोक्याने न चालवता मनगटावर चालवतात. त्यामुळे शिवसेनेची हवा त्यांच्याभोवतीच फिरत आहे.
शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांचे राजू शेट्टी शिष्य आहेत. पाटील यांच्यावर चिखलफेक करीत आपणच शेतकऱ्यांचे सच्चे नेते आहोत, असा दिखावा ते करत आहेत. त्यामुळे शेतकरी संघटनेतील कार्यकर्त्यांची वाताहत होत चालली आहे.