राष्ट्रवादीच्या काळजात भाजपची ‘कट्यार’
By Admin | Updated: November 30, 2015 01:13 IST2015-11-30T00:07:43+5:302015-11-30T01:13:59+5:30
सावळजमध्ये सरपंच, उपसरपंच निवड : ‘आबांं’च्या होम पीचवर ‘काकां’ची खेळी

राष्ट्रवादीच्या काळजात भाजपची ‘कट्यार’
दत्ता पाटील -- तासगाव माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचा बालेकिल्ला म्हणून राज्यभर ख्याती असणाऱ्या सावळज (ता. तासगाव) ग्रामपंचायतीच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या सरपंच आणि उपसरपंचाची वर्णी लागली. सरपंच निवडीच्या निमित्ताने भाजपची सरपंच निवडीची कट्यार राष्ट्रवादीच्या कारभाऱ्यांच्या काळजात घुसल्याचे चित्र आहे, तर राष्ट्रवादीच्या दुहीचा नेमका फायदा घेत आबांच्या होम पीचवर भाजपचे खासदार संजयकाकांनी केलेली खेळी तूर्तास तरी भाजपच्या पथ्यावर पडली. एकेकाळी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची धुरा वाहिलेल्या आर. आर. पाटील यांच्या राजकारणाची सुरुवात सावळजमधून झाली. आबांनी पहिल्यांदा सावळज जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवून राजकारणाचा पाया घातला. सावळजसह गटातील गावांनीही आबांना उच्चांकी मताधिक्यासह नेहमीच सोबत केली. सावळजच्या ग्रामपंचायत निवडणुका आबा गटाच्या बाजूने एकतर्फी झाल्या. निवडणुका झाल्याच, तर त्या आबा गटांतर्गतच दोन गटात व्हायच्या. इथे विरोधकांचे अस्तित्व नगण्य होते. मात्र काही वर्षांत अग्रणीतून फारसे पाणी वाहिले नसले तरी, राजकीय प्रवाह मात्र अनेक वळणे घेऊन गेला.
त्यामुळे यावेळी झालेल्या निवडणुकांत भाजपने राष्ट्रवादीच्या एका गटाच्या खांद्यावर बंदूक ठेवत दुसऱ्या गटावर निशाणा साधला. मात्र खासदार संजयकाकांना सावळजचा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करायचा होता. त्यामुळे भापजच्या पदाधिकाऱ्यांनी राजकीय कट्यार चालवले. आता राष्ट्रवादीचे कारभारी कोणती भूमिका घेणार, याची उत्सुकता लागून राहिली आहे.
खासदार पडद्यामागून पडद्यावरसावळजच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंचायत समितीचे सदस्य चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात भाजप आणि राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर उनउने आणि वसंत सावंत यांच्या गटाने पॅनेल उभे केले होते. या पॅनेलच्या प्रचार पत्रकावर आर. आर. आबांसह माजी आ. दिनकरआबा पाटील यांचे छायाचित्र होते. मात्र खासदारांचे समर्थक पॅनेलमध्ये असून देखील त्यांचे छायाचित्र वगळण्यात आले होते. खा. संजयकाकांनी पडद्याआड केलेली पहिली खेळी यशस्वी ठरली. दुसऱ्या खेळीत राष्ट्रवादीच्या कारभाऱ्यांनाच धक्का देत, दहा सदस्यांची मोट बांधून भाजपचा सरपंच करण्याची किमया त्यांनी साधली.
राष्ट्रवादीने हक्क सोडला
तासगाव तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीनंतर भाजप आणि राष्ट्रवादीतील नेत्यांत दावेदारी सुरु होती. त्यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सावळजमध्ये राष्ट्रवादीच्या एका गटासह भाजपने पॅनेल लावल्यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादीचीच सत्ता असल्याचा दावा केला होता. मात्र सरपंच निवडीत राष्ट्रवादीला डावलल्यामुळे नेत्यांनीही या गावावर असणाऱ्या वर्चस्वाचा हक्क सोडला.