शिराळ्यात यंदा कॉँग्रेस की राष्ट्रवादी?
By Admin | Updated: September 5, 2014 00:10 IST2014-09-04T23:55:41+5:302014-09-05T00:10:11+5:30
उमेदवारीबाबत संभ्रम : वाळव्याच्या गावांतील राष्ट्रवादीच्या नेत्यांची भूमिका गुलदस्त्यात

शिराळ्यात यंदा कॉँग्रेस की राष्ट्रवादी?
इस्लामपूर : विधानसभा निवडणुकीत शिराळा मतदारसंघातून काँग्रेस आघाडीची उमेदवारी कोणाला मिळणार, याबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे. ही जागा काँग्रेसला जाणार की, राष्ट्रवादीला याचा निर्णय झालेला नाही. त्यातच महायुतीकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. शिवाय ग्रामविकासमंत्री जयंत पाटील आणि गटाची वाळवा तालुक्यातील ५९ गावांमध्ये काय भूमिका असेल, हे गुलदस्त्यात असल्याने आघाडीतील संभ्रम वाढला आहे. जयंत पाटील यावेळी स्वत:चे साडू सत्यजित देशमुख यांच्या पारड्यात वजन टाकणार की, आमदार मानसिंगराव नाईक यांच्या पाठीशी राहणार, हे स्पष्ट झालेले नाही.
आघाडीच्या जागावाटपात शिराळ्याची जागा काँग्रेसकडे आहे. मात्र मागील निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव नाईक यांना मदत करण्याऐवजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील आणि काँग्रेसचे सत्यजित देशमुख यांनी राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार मानसिंगराव नाईक यांना मदत केली होती. वाळवा तालुक्यातील नानासाहेब महाडिक, सी. बी. पाटील यांनीही आघाडीचा धर्म न पाळता मानसिंगराव नाईक यांना मदत केली होती. त्यामुळे शिवाजीराव नाईक यांना पराभव स्वीकारावा लागला होता.
यंदाच्या निवडणुकीत मात्र आघाडीच्या जागेचा घोळ निर्माण झाला आहे. कारण विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांचे चिरंजीव, काँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख यांनी कसल्याही परिस्थितीत पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवायचीच, असा निश्चय केला आहे. सत्यजित देशमुख यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून उमेदवारीसाठी प्रयत्न चालववले आहेत. त्यातच ते ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांचे साडू आहेत. त्यामुळे जयंत पाटील यांचे वजन यावेळी तरी सत्यजित यांच्यासाठी खर्चले जाणार का, असा प्रश्न त्यांचेच कार्यकर्ते करत आहे. दुसरीकडे विद्यमान आमदार मानसिंगराव नाईक यांनी या जागेवर राष्ट्रवादीचा दावा करीत, आपल्यालाच आघाडीचे तिकीट मिळणार, असे गृहीत धरले आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून देशमुख आणि आ. नाईक गटातील दरी रूंदावली आहे.
महायुतीकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे खासदार राजू शेट्टी यांनी माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांची उमेदवारी जाहीर केली आहे. असे असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीत मात्र संभ्रम दिसत आहे. (प्रतिनिधी)
५९ गावांमधील भूमिका गुलदस्त्यातच
शिराळा मतदारसंघात वाळवा तालुक्यातील ५९ गावे येतात. या गावांचे मतदान निर्णायक ठरते. तेथे जयंत पाटील यांच्यासोबत शिवाजीराव नाईक, महाडिक, सी. बी. पाटील, अभिजित पाटील, देशमुख हे गटही प्रबळ आहेत. मात्र खुद्द जयंत पाटील आणि गटाची या ५९ गावांमधील भूमिका अद्याप गुलदस्त्यातच आहे. शिवाय सत्यजित देशमुख यांनी शिराळ्यावर दावा केला आहे.
जयंत पाटील यांनी शिराळा मतदारसंघावर वर्चस्व ठेवण्यासाठी वेळोवेळी खेळ्या केल्या आहेत. यावेळी मात्र जयंत पाटील यांना त्यांच्या इस्लामपूर मतदारसंघात अडकवून ठेवण्यासाठी राजू शेट्टी यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. महाडिक, सी. बी. पाटील आणि अभिजित पाटील हे महायुतीच्या बाजूने आहेत. त्यांचा राष्ट्रवादीला विरोध आहे. नानासाहेब महाडिक स्वत: जयंत पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढविणार आहेत. त्यामुळे जयंत पाटील आणि मानसिंगराव नाईक यांच्यापुढे आव्हान उभे आहे.