राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्षपदी बजाज
By Admin | Updated: December 1, 2014 00:03 IST2014-11-30T22:29:16+5:302014-12-01T00:03:04+5:30
मुंबईत निवड : सुनील तटकरे यांनी दिले निवडीचे पत्र

राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्षपदी बजाज
सांगली : गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त असलेल्या राष्ट्रवादीच्या शहर जिल्हाध्यक्ष पदावर नगरसेवक संजय बजाज यांची निवड करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांना मुंबईत येथे निवडीचे पत्र दिले. महापालिका क्षेत्रातील अन्य रिक्त पदांच्या निवडीबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.
या पदाच्या शर्यतीत बजाज यांच्यासह प्रा. पद्माकर जगदाळे यांचेही नाव चर्चेत होते. बजाज हे सध्या महापालिकेत स्वीकृत सदस्य आहेत. माजी मंत्री जयंत पाटील यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. मुंबईत झालेल्या त्यांच्या निवडीवेळीही जयंत पाटील उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी दिनकर पाटील यांनी या पदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून हे पद रिक्त होते. त्यांच्या राजीनाम्यामुळे महापालिका क्षेत्रातील सर्व कार्यकारिण्या आपोआपच संपुष्टात आल्या. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून पक्षाचा महापालिका क्षेत्रातील कारभार ठप्प आहे. नव्या निवडी करण्याबाबत पक्षीय स्तरावर विलंब झाल्यामुळे कार्यकर्तेही नाराज होते. आता शहर जिल्हाध्यक्ष निवडीमुळे अन्य रिक्त पदेही भरली जातील, असे सांगण्यात येत आहे.
शहराबरोबरच जिल्ह्यातही अनेक ठिकाणची पदे रिक्त आहेत. या पदांबाबतही अद्याप निर्णय झालेला नाही. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीच्या नेत्यांची मोठी फळी भाजप व शिवसेनेत गेल्यामुळे सध्या राष्ट्रवादीत अनेक पदे रिक्त आहेत. तालुकास्तरावरील कार्यकर्त्यांची संख्याही त्यामुळे घटली आहे. अशा परिस्थितीत पक्षाच्या पुनर्बांधणीचा निर्धार जयंत पाटील व आर. आर. पाटील यांनी केला आहे. त्यामुळे त्यांचा हा निर्धार कितपत सत्यात उतरणार, याकडे आता राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)