तांबवेच्या नरसिंह टायगर्सने पटकावला जयंत चषक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:49 IST2021-02-21T04:49:43+5:302021-02-21T04:49:43+5:30
इस्लामपूर : ग्रामीण भागातही कबड्डीचे टॅलेंट आहे. याची चुणूक दाखवत कृष्णा नदीकाठच्या रांगड्या खेळाडूंनी तालुका स्तरावरील पहिली जयंत कबड्डी ...

तांबवेच्या नरसिंह टायगर्सने पटकावला जयंत चषक
इस्लामपूर : ग्रामीण भागातही कबड्डीचे टॅलेंट आहे. याची चुणूक दाखवत कृष्णा नदीकाठच्या रांगड्या खेळाडूंनी तालुका स्तरावरील पहिली जयंत कबड्डी प्रीमिअर लीग गाजविली. अंतिम सामन्यात पल्लेदार चढाया, भक्कम क्षेत्ररक्षण, बोनस आणि सुपर टेकलचे गुण मिळवत विजयाच्या पारड्यात बसण्यासाठी नरसिंह टायगर्स आणि एस. एल. हरिकेन्सच्या खेळाडूंनी जिवाची बाजी लावत कबड्डी रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. तांबवेच्या नरसिंहने हा सामना पाच गुणांनी जिंकत २५ हजार रुपये आणि जयंत चषकावर आपले नाव कोरले. स्व. शरद लाहिगडे (एस. एल.) हरिकेन्स (कासेगाव) यांनी दुसरा, तर स्फूर्ती रॉयल्स (जुनेखेड) व लोकनेते राजारामबापू पाटील ईगल्स (कासेगाव)ने तिसरा क्रमांक पटकाविला.
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जयंत स्पोर्टसने आयोजित पाच दिवसांच्या लीगला कबड्डीप्रेमींचा अलोट प्रतिसाद लाभला. उदय जगताप (नरसिंह) अष्टपैलू खेळाडू, विशाल चिबडे (नरसिंह) उत्कृष्ट चढाईपटू, तर आकाश शिवशरण (एस. एल.) उत्कृष्ट बचावपटूचे मानकरी ठरले. जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील यांनी स्पर्धेस भेट देत खेळाडूंचे कौतुक केले.
नरसिंह टायगर्स विरुद्ध एस. एल. हरिकेन्स यांच्यातील चुरशीच्या अंतिम सामन्यात नरसिंह प्रथम ६ गुणांनी पिछाडीवर होता. मात्र उदय जगताप व विशाल चिबडे यांच्या अष्टपैलू खेळाने ही पिछाडी भरून काढत ३०-२५ अशा ५ गुणांनी हरिकेन्सवर मात केली. विशेष म्हणजे एस. एल. हरिकेन्सने नरसिंहला ५ गुणांनी नमवूनच अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. यानंतर नरसिंहने स्फूर्ती रॉयल्सवर विजय मिळून अंतिम सामन्यात हरिकेन्सला आव्हान दिले.
विजेत्या संघांना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, माजी उपाध्यक्ष रणजित पाटील, मुख्य संयोजक, नगरसेवक खंडेराव जाधव, सातारा डिस्ट्रिक्ट वुमेन्स एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा रूपाली जाधव यांच्या हस्ते रोख रक्कम व चषक वितरण करण्यात आले. यावेळी प्रकाश जाधव, अरुण कांबळे, आयुब हवालदार, अतुल लाहिगडे, ज्ञानदेव देसाई, हमीद लांडगे, ब्रह्मनंद पाटील, सागर पाटील, नितीन कोळगे, विनायक पाटील, मनीषा बाणेकर उपस्थित होते.
सांगलीचे आलम मुजावर पंच समितीचे प्रमुख होते. प्रशांत कोरे, विकास पाटील, झाकीर इनामदार, गणेश भस्मे, नीलेश देसाई, कामेरीचे रणजित इनामदार, जयराज पाटील, शिराळ्याचे सुशीलकुमार गायकवाड, वाळव्याचे सागर हेळवी, तुषार धनवडे, ऐतवडे खुर्दचे धनाजी सिद्ध यांनी पंच म्हणून जबाबदारी पार पाडली.
सागर जाधव, उमेश रासनकर, विजय देसाई, सदानंद पाटील, सचिन कोळी, अंकुश जाधव, शिवाजी पाटील, राजवर्धन लाड, अजय थोरात यांच्यासह जयंत स्पोर्ट्सच्या कार्यकर्त्यांनी स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन केले. किशोर गावडे (मुंबई), प्रसाद कुलकर्णी (राजारामनगर) यांनी आपल्या प्रभावी वाणीने लीगमध्ये रंगत आणली. राहुल जोशी, विजय महाडिक यांनी स्पर्धेचे प्रक्षेपण केले.