७६ वर्ष नणंद-भावजय राहिलेल्या मैत्रिणींचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:32 IST2021-08-17T04:32:43+5:302021-08-17T04:32:43+5:30

कोकरुड : असे म्हटले जाते की, दहा पुरुष एकत्र राहू शकतात. मात्र दोन महिला एकत्र राहू शकत नाहीत, अगदी ...

Nanand-Bhavjay, who lived for 76 years, passed away | ७६ वर्ष नणंद-भावजय राहिलेल्या मैत्रिणींचे निधन

७६ वर्ष नणंद-भावजय राहिलेल्या मैत्रिणींचे निधन

कोकरुड : असे म्हटले जाते की, दहा पुरुष एकत्र राहू शकतात. मात्र दोन महिला एकत्र राहू शकत नाहीत, अगदी त्या सख्ख्या बहिणी असल्या तरी. मात्र सय्यदवाडी (येळापूर, ता. शिराळा) येथील ७६ वर्षांपेक्षा जास्त काळ मैत्रिणीसारख्या राहणाऱ्या नणंद-भावजयीचे अडीच महिन्यांच्या अंतरात निधन झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. पुतळाबाई ज्ञानदेव पाटील व सखुबाई खाशाबा खाेचरे या त्या जीवश्च-कंठश्च मैत्रिणी राहिलेल्या नणंद-भावजयी.

सय्यदवाडी येथील विठ्ठल ज्ञानदेव पाटील यांच्या पोटी ९० वर्षांपूर्वी ज्ञानदेव आणि ८७ वर्षांपूर्वी सखुबाई ही अपत्ये जन्माला आली. विठ्ठल पाटील यांनी ज्ञानदेव यांचे लग्न हत्तेगाव येथील पुतळाबाई यांच्याशी लावले तर सखुबाई यांचा विवाह जिंती (ता. कऱ्हाड) येथील खाशाबा खोचरे यांच्याशी झाला होता. मात्र, एक-दीड वर्षात पतीचे निधन झाल्याने सखुबाई माहेरी आल्या. त्याकाळी दुसऱ्या लग्नाची प्रथा नव्हती. सखुबाई वडिलांच्या घरीच राहू लागल्या. घरी आई-वडील, भाऊ, भावाची बायको, तीन मुले होती. मात्र भावजय पुतळाबाई हिने विधवा असलेल्या नणंद सखुबाई हिच्याबरोबर जमवून घेतले. दाेघी केवळ नणंद-भावजय असे नाते न राखता मैत्रिणी म्हणून राहू लागल्या. एक-दोन वर्षे नव्हे तर तब्बल ७६ वर्ष एकत्र राहत दाेघीही एकमेकींची सुख-दुःखे वाटून घेत राहिल्या. जून महिन्यात पुतळाबाई किरकोळ आजारी पडल्या. यावेळी सखुबाई हादरल्या. ‘हिचे काय झाले तर माझे कसे होणार’ या काळजीने त्यांना हृदयविकाराचा झटका आला व त्यातच त्यांचे निधन झाले. त्याला अडीच महिने हाेत असताना रविवार, १५ ऑगस्टला पुतळाबाई यांचेही निधन झाले. गेली ७६ वर्ष मैत्रिणींप्रमाणे राहिलेल्या या नणंद-भावजयीच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.

चाैकट

नात्याचे आदर्श उदाहरण

अनेकदा परिसरातील अनेक घरांत नणंद-भावजयीचे भांडण-तंटे व्हायचे. त्यावेळी नणंद-भावजय यांचे नाते कसे असावे, याचे आदर्श उदाहरण म्हणून पुतळाबाई आणि सखुबाई यांचे नाव वडीलधारी माणसे घेत असत.

Web Title: Nanand-Bhavjay, who lived for 76 years, passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.