नागजमध्ये ‘टेंभू’च्या पाण्याने जल्लोष
By Admin | Updated: April 29, 2016 00:24 IST2016-04-28T23:52:55+5:302016-04-29T00:24:38+5:30
मान्यवरांच्या उपस्थितीत पूजन : गुलाल, भंडारा उधळत आनंदोत्सव साजरा

नागजमध्ये ‘टेंभू’च्या पाण्याने जल्लोष
ढालगाव : नागज (ता. कवठेमहांकाळ) येथील ओढ्यात ‘टेंभू’चे पाणी रात्री दहाच्या सुमारास आले होते. त्याचे पूजन गुरूवारी प्रभाकर संजय पाटील, जिल्हा मध्यवती बँकेचे संचालक चंद्रकांत हाके, जिल्हा परिषद सदस्य राधाबाई हाके, सभापती वैशाली पाटील, औदुंबर पाटील, हायूम सावनूरकर, माजी उपसभापती दादासाहेब कोळेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
‘बिरोबाच्या नावानं चांगभलंऽऽ’चा जयघोष करीत नागजसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी गुलाल, भंडारा उधळत अक्षरश: आनंदोत्सव साजरा केला. येथे पाण्याचे औपचारिक पूजन असले तरी, नागजसह परिसरात पाणी कवठेमहांकाळ तालुक्यातील या परिसरात केव्हा येणार, ही उत्सुकता लागली होती. ती गुरूवारी पूर्ण झाली. रमेश साबळे, मिलिंद कोरे यांच्यासह युवकांनी हा आनंदोत्सव साजरा केला.
या पाण्याच्या पूजनासाठी ढालगाव येथून विजय घागरे, आरेवाडीतून रावसाहेब कोळेकर, चुडेखिंडीतून बापूसाहेब भुसनूर, कदमवाडीतून पांडुरंग कदम, निमजमधून राम आमुणे, घोरपडीतून माजी सरपंच भगवान सरगर, केराप्पा लोखंडे आदींसह मोठ्या संस्थेने ग्रामस्थ उपस्थित होते.
या पाण्याचा नागज, निमज, कदमवाडी, दुधेभावी, चोरोची, ढोलेवाडी या गावांना तर लाभ होणारच आहे, परंतु ढालगाव, कदमवाडी, दुधेभावी, शिंदेवाडी, घोरपडी यांसह अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मिटणार आहे. दुधेभावी तलावातून अनेक गावांना पिण्याच्या पाण्याच्या योजना केलेल्या आहेत. टेभूचे पाणी आल्याने आता नागरीकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न काही अंशी मिटला आहे. (वार्ताहर)