वाळवा : पद्मभूषण क्रांतिवीर डाॅ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या स्मारकाचे काम येथे युद्धपातळीवर सुरू आहे.
या स्मारकाची उभारणी हुतात्मा साखर कारखाना कार्यस्थळावरील पंधरा हजार चौरस मीटर जागेवर अभियंता वसंत वाजे करीत आहेत. राज्य शासनाने सव्वादहा कोटींचा निधी मंजूर केला आहे. अण्णांच्या स्वातंत्र्यपूर्व व नंतरच्या रचनात्मक कार्याला साजेशा स्मारकाच्या उभारणीचे काम सुरू आहे. त्यासाठी कारखाना कार्यस्थळावर तीन एकर जमीन शासनास हस्तांतरित करण्यात आली आहे. या स्मारकात अण्णांचा जीवनपट उलगडणारे चित्रदालन, ऑडिटोरियम, सहकार प्रशिक्षण केंद्र यांचा अंतर्भाव आहे. आतापर्यंत सव्वाचार कोटी रुपये स्मारकासाठी खर्च झाले आहेत. शासकीय पातळीवर निधीची तरतूद करण्यासाठी हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाचे नेते वैभव नायकवडी सातत्याने पाठपुरावा करीत आहेत.
कोट
क्रांतिवीर डाॅ. नागनाथ अण्णांच्या विचारांचा वसा आणि वारसा सांभाळताना अण्णांच्या कार्याला साजेसे स्मारक उभारण्याचे प्रयत्न आहेत. हे स्मारक भविष्यात वंचित, उपेक्षित जनतेच्या हितासाठी होणाऱ्या चळवळींना प्रेरणा देईल.
- वैभव नायकवडी
फोटो ओळी : वाळवा येथील क्रांतिवीर डाॅ. नागनाथअण्णांच्या स्मारकाची उभारणी गतीने सुरू आहे.