आष्टा येथील नागेश देसाई यांच्या हळदीला उच्चांकी १४ हजार १९० रुपये दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:24 IST2021-02-07T04:24:25+5:302021-02-07T04:24:25+5:30
आष्टा : आष्टा (ता. वाळवा) येथील प्रगतशील शेतकरी नागेश पांडुरंग देसाई यांनी हळदीचे एकरी ३६ क्विंटल उत्पादन घेतले. या ...

आष्टा येथील नागेश देसाई यांच्या हळदीला उच्चांकी १४ हजार १९० रुपये दर
आष्टा : आष्टा (ता. वाळवा) येथील प्रगतशील शेतकरी नागेश पांडुरंग देसाई यांनी हळदीचे एकरी ३६ क्विंटल उत्पादन घेतले. या हळदीला सांगलीच्या बाजारपेठेत उच्चांकी १४ हजार १९० रुपये याप्रमाणे दर मिळाला.
नागेश देसाई यांनी आपल्या शेतात ऊस व केळी लागवड केली आहे. त्याचप्रमाणे १ एकर क्षेत्रावर १ मे रोजी ट्रॅक्टरच्या साहाय्याने सेलम हळदीची लागवड केली. या हळदीला शेणखत सुमारे बारा ट्रॉल्या तसेच ठिबक सिंचनमधून १२:६१, १३:०:४५ व ०-५० ही रासायनिक खते तसेच जिवामृत वेळोवेळी दिले. ठिबक सिंचनमुळे नियमित हळदीला हवे तेवढे पाणी मिळाले.
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हळद काढण्यात आली. या हळदीचे एकूण उत्पादन ३६ क्विंटल मिळाले. सांगली येथील वसंतदादा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हळद बाजारपेठेत राजेंद्र पाटील यांच्या दुकानात या हळदीला सर्वाधिक १४ हजार १९० रुपये दर मिळाला. क्रमांक २ च्या हळदीला ९ हजार, क्रमांक ३ च्या हळदीला ६४२५, कणीला ६०००, तर तर अंगठा गड्डा हळदीला ७ हजार २०० रुपये दर मिळाला.
नागेश देसाई म्हणाले, प्रतिवर्षी आष्टा येथील हळद बाजारपेठेत हळदीची विक्री करत हाेताे. मात्र आष्टा येथील बाजारपेठ अद्याप सुरू न झाल्याने सांगली बाजारपेठेत हळद विक्री केली. या हळदीला विक्रमी १४ हजार १९० रुपये प्रमाणे दर मिळाला.
फोटो : ०६ आष्टा १
ओळ : नागेश देसाई व त्यांची हळद.