म्युकरमायकोसिसने पंधरा जणांच्या आयुष्यात केला अंधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:18 IST2021-06-11T04:18:06+5:302021-06-11T04:18:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : म्युकरमायकोसिसच्या हल्ल्यात जिल्ह्यात १५ रुग्णांना दृष्टी गमवावी लागली आहे. यापैकी १४ जणांनी एक डोळा ...

Myocardial infarction has darkened the lives of fifteen people | म्युकरमायकोसिसने पंधरा जणांच्या आयुष्यात केला अंधार

म्युकरमायकोसिसने पंधरा जणांच्या आयुष्यात केला अंधार

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : म्युकरमायकोसिसच्या हल्ल्यात जिल्ह्यात १५ रुग्णांना दृष्टी गमवावी लागली आहे. यापैकी १४ जणांनी एक डोळा गमावला असून, एका रुग्णाच्या दोन्ही डोळ्यांना अंधत्व आले आहे.

म्युकरमायकोसिस तथा काळी बुरशी सायनसमधून डोळ्यांच्या नसांपर्यंत व तेथून मेंदूपर्यंत पसरते. ती पूर्णत: खरडून काढावी लागते. योग्यवेळी योग्य उपचार घेतले नाहीत, तर प्रसंगी जिवावरही बेतते. सध्या जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे २२९ रुग्ण आहेत, त्यापैकी १५ रुग्णांना दृष्टी गमवावी लागली आहे. सायनसमधून पसरत गेलेल्या बुरशीने डोळ्यांच्या नसांवर हल्ला केल्याने त्या काढून टाकाव्या लागल्या. १५ पैकी १४ रुग्णांच्या एका डोळ्याची नस काढावी लागली. त्यामुळे त्यांना अंशत: अंधत्व आले. एका रुग्णाच्या दोन्ही डोळ्यांमागील नसांवर बुरशीने हल्ला केला. त्यामुळे दोन्ही नसा काढून टाकण्याशिवाय पर्याय राहिला नाही. त्याला पूर्ण अंधत्व आले. या रुग्णांची दृष्टी गेली असली तरी बुबुळे शाबूत आहेत, त्यामुळे चेहरा सुदृढ दिसतो; पण त्यांच्या आयुष्यात मात्र अंधार पसरला आहे.

म्युकरमायकोसिस झालेल्या अनेक रुग्णांवर मोठ्या शस्त्रक्रियाही कराव्या लागल्या आहेत.

चौकट

...असा आहे काळ्या बुरशीचा फैलाव

- जिल्ह्यात बुधवारअखेरचे रुग्ण २२९

- म्युकरमायकोसिसमुळे झालेले मृत्यू १४

- म्युकरमायकोसिसमुळे अंशत: दृष्टी गमावलेले १५

- म्युकरमायकोसिसमुळे दोन्ही डोळे गमावले १

कोट

या सर्व रुग्णांना म्युकरमायकोसिसमुळे दृष्टी गमवावी लागली, असे म्हणता येत नाही. काही रुग्णांना पूर्वीपासून डोळ्यांचे विकार होते, ते म्युकरमायकोसिसमुळे बळावले. काही रुग्णांना मधुमेह होता, म्युकरमायकोसिस झाल्यावर मधुमेहामुळे गंभीर स्थिती झाली. अनेक रुग्णांना कोरोना झाल्यावरच आपल्याला मधुमेहासह अन्य विकार असल्याचे समजले. आरोग्यविषयी दुर्लक्ष केल्याचा त्यांना फटका बसला.

-डॉ. संजय पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक

कोट

म्युकरमायकोसिसची रुग्णसंख्या सध्या कमी होत आहे. योग्य व वेळेत उपचारांनी डोळे गमावण्यापासून बचाव करता येतो. पहिल्याच टप्प्यात लक्षणे दिसल्यानंतर त्वरित उपचार घ्यायला हवेत. विशेषत: मधुमेहींनी अधिक काळजी घ्यायला हवी. कोरोनाबाधितांनी डोळे, नाक व दातांच्या वेदनांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.

-डॉ. सुधीर कदम, नाक, कान, घसातज्ज्ञ व म्युकरमायकोसिस टास्क फोर्सचे सदस्य

Web Title: Myocardial infarction has darkened the lives of fifteen people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.