मोटारीच्या धडकेत मायलेकी ठार
By Admin | Updated: May 14, 2016 23:49 IST2016-05-14T23:49:10+5:302016-05-14T23:49:10+5:30
तांदुळवाडीतील दुर्घटना : मॉर्निंग वॉक करताना अज्ञात वाहनाने उडविले

मोटारीच्या धडकेत मायलेकी ठार
कुरळप : तांदुळवाडी (ता. वाळवा) येथे पहाटे फिरावयास गेलेल्या पुतळाबाई अमृत पाटील (वय ७०) व त्यांची मुलगी प्रभावती मधुकर पवार (४५, दोघीही रा. तांदुळवाडी) या मायलेकी अज्ञात मोटारीच्या धडकेत जागीच ठार झाल्या. ही घटना शनिवारी पहाटे साडेपाच वाजता राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वर गुरव पुलानजीक घडली.
रेठरेहरणाक्ष सासर असलेल्या
प्रभावती पवार पतीच्या निधनानंतर
गेल्या बारा वर्षांपासून तांदुळवाडी येथे माहेरी राहत होत्या. आई पुतळाबाई व त्या दररोज पहाटे राष्ट्रीय महामार्गालगत सेवा रस्त्यावर फिरायला जात होत्या. शनिवारी पहाटे त्या नेहमीप्रमाणे फिरायला बाहेर पडल्या.
गुरव पुलाजवळ महामार्ग ओलांडत असताना कोल्हापूरहून कऱ्हाडकडे जाणाऱ्या अज्ञात मोटारीने त्यांना जोरदार धडक दिली. गंभीर जखमी होऊन दोघीही रस्त्यावर पडल्या. डोक्यास वर्मी मार लागल्याने दोघींचाही जागीच मृत्यू झाला. मायलेकींच्या मृत्यूमुळे तांदुळवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पुतळाबाई यांना चार मुली व दोन मुले असा परिवार आहे, तर प्रभावती यांना एक मुलगा व एक मुलगी आहे.
अपघाताबाबत मोहन शंकर पाटील (४०, रा. तांदूळवाडी) यांनी कुरळप पोलिसांत वर्दी दिली असून सहायक पोलिस निरीक्षक पल्लवी चव्हाण अधिक तपास करीत आहेत.