माझे लक्ष २०२४ च्या लोकसभेकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:30 IST2021-08-22T04:30:02+5:302021-08-22T04:30:02+5:30
इस्लामपूर : राज्यपाल नियुक्त आमदार हा विषय आता डोक्यातून बाजूला केला आहे. जे काही व्हायचे ते होऊदे, अशा शब्दात ...

माझे लक्ष २०२४ च्या लोकसभेकडे
इस्लामपूर : राज्यपाल नियुक्त आमदार हा विषय आता डोक्यातून बाजूला केला आहे. जे काही व्हायचे ते होऊदे, अशा शब्दात आमदार नियुक्तीचा विषय झटकून टाकत माजी खासदार राजू शेट्टी यांनी ‘माझे लक्ष आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीकडे आहे’, असे स्पष्ट केले.
इस्लामपूर येथे मंगळवारी होणाऱ्या पूरग्रस्तांच्या आक्रोश मोर्चाची माहिती देण्यासाठी आल्यावर शेट्टी बोलत होते. यावेळी भाजपचे माजी आमदार शिवाजीराव नाईक, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आणि नगराध्यक्ष निशिकांत पाटील उपस्थित होते.
पत्रकारांनी राज्यपाल नियुक्तीचा प्रश्न केल्यावर शेट्टी म्हणाले की, मी त्यातलाच एक आहे. मात्र आता हा विषय डोक्यातून बाजूला काढला आहे. नियुक्त्या कधी व्हायच्या त्या होऊद्यात. त्या यादीत माझे नाव आहे एवढे मात्र नक्की.
ते म्हणाले की, माझे लक्ष आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीकडे आहे. त्यातच आमदार पद हे माझे साध्य नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अखेरपर्यंत लढत राहणे यालाच सर्वोच्च प्राधान्य देऊ. इस्लामपूर पालिकेच्या निवडणुकीत पुन्हा काही चांगले घडविण्यासाठी नक्की येऊ. मात्र अगोदर पूरग्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्न निकाली लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.