मुस्लिम युवतींनी साजरी केली शिवजयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:18 IST2021-02-20T05:18:20+5:302021-02-20T05:18:20+5:30
पेठ : जाती-धर्माच्या भिंती भेदून माणसाला माणुसकीने जगायला शिकवणारे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पेठ (ता. वाळवा) येथील ...

मुस्लिम युवतींनी साजरी केली शिवजयंती
पेठ : जाती-धर्माच्या भिंती भेदून माणसाला माणुसकीने जगायला शिकवणारे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पेठ (ता. वाळवा) येथील रुबिना नजीर मुल्ला व फरिदा नजीर मुल्ला या मुस्लिम युवतींनी लहान मुलांना मिठाई वाटप करून एक आगळीवेगळी शिवजयंती साजरी केल्याने त्यांच्या या उपक्रमाचे पेठ पंचक्रोशीत कौतुक होत आहे.
नेहमीच वेगवेगळे सामाजिक कार्य राबवणाऱ्या रुबिना, फरिदा व त्यांचे बंधू नईम मुल्ला यांनी कोरोनाच्या काळात कासेगाव ते वाघवाडी हायवे परिसरात ऊन -पावसाची तमा न बाळगता उभ्या असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना चहा-नाश्ता व नारळ पाणी देण्याचे कार्य केले होते. २६ जानेवारी व १५ ऑगस्टला हिंदू-मुस्लिम एकात्मतेचे संदेश देणारे डिजिटल फलक लावणे, रक्षाबंधन सणाच्या वेळी सीमेवर लढणाऱ्या फौजी बांधवांना राख्या पाठवणे, असे सामाजिक उपक्रम या दोन युवती नेहमीच राबवत असतात.
शुक्रवारी शिवजयंतीचे औचित्य साधून या युवतींचे वडील पेठेचे प्रसिद्ध शायर व आदर्श कलारत्न पुरस्कार विजेते नजीर हुसेन गुलाब मुल्ला यांच्याहस्ते शिंपी समाजाच्या वतीने शिवजयंती साजरी करून शिंपी समाजाने समाजात एक आदर्श निर्माण केला आहे. याप्रसंगी शिंपी समाजाचे अध्यक्ष नीलेश भांबुरे, उपाध्यक्ष विकास दाभाेळे, विकास पेठकर, अंबादास पेठकर, दीपक दाभाेळे, रोहित पेठकर, सौरव भांबुरे, सोमनाथ जाधव, हणमंत जाधव, हंबीरराव पाटील तसेच शिंपी समाजबांधव उपस्थित होते.