आईच्या प्रेमळ दातृत्वाला संगीतमयी सलाम
By Admin | Updated: May 11, 2016 00:46 IST2016-05-10T23:07:51+5:302016-05-11T00:46:45+5:30
सांगलीत कार्यक्रम : मराठी-हिंदी गीतांची सुरेल मैफल; कलाकारांच्या सादरीकरणास श्रोत्यांची दाद
आईच्या प्रेमळ दातृत्वाला संगीतमयी सलाम
सांगली : आईच्या प्रेमळ दातृत्वाला, तिच्या अनेक रूपांना, तिच्यातच सामावलेल्या विश्वाला सांगलीत रंगलेल्या संगीत मैफलीतून सलाम करण्यात आला.
‘लोकमत’ सखी मंच व श्रीवरि व्यंकटेश्वरा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मातृदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथील मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयाच्या प्रांगणात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती संतोष पाटील, मालतीताई जोशी यांच्याहस्ते दीपप्रज्ज्वलन व धन्वंतरी पूजनाने करण्यात आले. ‘विठुमाऊली तू माऊली जगाची’ या सुंदर गीताने मैफलीची सुरुवात झाली. त्यानंतर ‘लिंबलोण उतरू कशी’, ‘प्रेमस्वरुप आई’, ‘ए आई मला पावसात जाऊ दे’, ‘ माता न तू वैरिणी’, ‘यशोमती मैया से’, ‘दाटून कंठ येतो’, ‘ने मजसी ने’, ‘माऊली माऊली’, ‘खुशियों का दिन आया है’, ‘या चिमण्यांनो’, अशी एकापेक्षा एक अवीट व सुरेख गाणी सादर करण्यात आली.
अभिषेक काळे, यशश्री जोशी, श्रद्धा जोशी, आस्था ओगले, श्रीनिवास हसबनीस या कलाकारांनी ही सुंदर गाणी सादर केली. दीपक पाटणकर यांच्या निवेदनानेही मैफलीला साज चढविला. सिंथेसायझरसाथ अविनाश इनामदार, हार्मोनिअमसाथ केदार सांभारे, तबलासाथ विवेक पोतदार, तालवाद्यावर किरण ठाणेदार, बासरीसाथ रसूल मुलाणी व ढोलकसाथ अजय भोगले यांनी दिली. ट्रस्टचे अध्यक्ष शिवाजी हसबनीस, उपाध्यक्षा प्रियांका कुलकर्णी, खजिनदार अरुण नेने, वामन कुलकर्णी, निर्मला नेने, सोनाली कुलकर्णी, गोवर्धनराजे हसबनीस यांनी संयोजन केले. सांगली, मिरज, कुपवाड शहरांसह जिल्ह्यातून सखी मंच सदस्यांनी या कार्यक्रमाचा आनंद लुटला. (प्रतिनिधी)
‘लोकमत’ सखी मंच व श्रीवरि व्यंकटेश्वरा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यातर्फे ‘आई... एक प्रेमळ दातृत्व’ हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन ‘लोकमत’चे संस्थापक स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, तसेच दीपप्रज्ज्वलनाने करण्यात आले. यावेळी महापालिका स्थायी समिती सभापती संतोष पाटील, आर. जे. कुलकर्णी, मालतीताई जोशी आदी उपस्थित होते. दुसऱ्या छायाचित्रामध्ये कलाकारांनी सुंदर गीते सादर करून मैफल रंगविली.